एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अत्याधुनिक मुद्रण तंत्र
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या लिओनार्दो द विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील उपयोजित कला – अप्लाईड आर्टच्या विद्यार्थ्यांनी चिकलठाणा एमआयडीसीमधील प्रिंट वेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट देऊन अत्याधुनिक मुद्रण तंत्राचा अभ्यास केला.
विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीदरम्यान प्री-प्रेस, ऑफसेट प्रिंटींग, लॅमिनेशन, बाईंडिंग, कटिंग आदि संबंधित विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. विद्यापीठाच्या बावीस विद्यार्थ्यांचा या अभ्यास भेटीमध्ये सहभाग होता. प्रिंटवेलचे संचालक सागर प्रदीप शिंदे तसेच दिलीप शिंदे यांनी या विद्यार्थ्यांना आधुनिक मुद्रणासंदर्भातली माहिती दिली. उपयोजित कला विषयाचे मार्गदर्शक प्रा. जितेंद्र पवार व प्रा. दीपक बोरसे या औद्योगिक अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.