महात्मा गांधी मिशन नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली रुग्णसेवेची शपथ
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात नव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (दि. २८) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, प्रमुख पाहुणे प्रयास फाउंडेशनचे संचालक डॉ.अविनाश सावजी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र बोईटे, प्राचार्या डॉ. विद्याराणी यूमनम, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
फ्लोरेंस नाईटिंगल यांनी किमीया युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना सांभाळताना हाती घेतलेले व्रत परिचर्या व्यवसायामध्ये सेवेचे प्रतीक मानले जाते. याच पार्श्वभूमीवर परिचर्या सेवेतील विद्यार्थी या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेंस नाईटिंगल यांनी घालून दिलेली शपथ घेत असतात. अशाच प्रकारे एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांची अविरतपणे सेवा करीत व रुग्णांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी दीप प्रज्वलन करून शपथ घेतली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या गृहपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल प्राचार्य सतीशचंद्र बोईटे व प्राचार्या विद्याराणी यूमनम यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ बिरादार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदा शेख व अर्पिता देठे यांनी केले तर आभार डॉ. अमरजा गोसावी यांनी मानले.