सोलापूर विद्यापीठात कला, क्रीडा, एनएसएसमधील यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांनी काम करावे – महेश चोप्रा
सोलापूर : भारत हा तरुणांचा देश आहे. भारताकडे मोठी युवा ऊर्जा शक्ती आहे. या ऊर्जा शक्तीच्या बळावरच भारत महासत्ता होऊ शकतो. महासत्ता होण्यासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांनी काम करावे, असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या तिन्ही विभागातील राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान महेश चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.
महेश चोप्रा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज कला, क्रीडा आणि एनएसएस या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. विद्यापीठाची वाटचाल आज प्रगतीच्या दिशेने सुरू आहे, ही अभिमानाची बाब आहे. देशाला देखील विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. विकासाकडे वाटचाल करत असताना आणखीन काम करावे लागणार आहे. त्यासाठी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील क्रीडा एनएसएस आणि विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवून विद्यापीठाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यंदाच्या वर्षी क्रीडा विभागामध्ये 35 हून अधिक पारितोषिके विद्यापीठास प्राप्त झाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. सोलापूरच्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची शक्ती आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून मल्टीपर्पज इनडोअर हॉलची निर्मिती होत आहे. सुसज्ज नाट्यगृहाची देखील निर्मिती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पुढील काळात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. एस. यु. मुजमुले, उत्कर्ष क्षीरसागर, डॉ. तेजस्विनी कांबळे, सागर नाईकनवरे, प्रा. बाळासाहेब वाघचौरे, अरुण राठोड, प्रा. आर. डी. पवार, प्रा. डी. एस. भिसे, नागेश जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.