”स्वारातीम” विद्यापीठात विविध राज्यातील विद्यार्थी घेत आहेत चित्रपट अभिनयाचे धडे
नांदेड : उत्तरांचल, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून आलेले विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट अभिनयाचे पाठ गिरवत आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही विद्यार्थी आनंदाने अभ्यास करत आहेत.
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात चित्रपट प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट विषयक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
एफटीआयआय सीएफओएलचे एक्झेकेटिव्ह हेड संदीप शहारे आणि कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी बुधवार (दि २८) रोजी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी हृद्य संवाद साधला.
चित्रपट माध्ममाच्या संदर्भात जागरूकता पालकांमध्येही आढळत नाही, मात्र ‘स्वारातीम’ विद्यापीठाने चित्रपट अभ्यासक्रमासंदर्भात भविष्यवेधी पाऊल उचलले आहे. चित्रपट साक्षरता व चित्रपट प्रशिक्षण देण्यामध्ये देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये नांदेड विद्यापीठ अग्रस्थानी आहे. अशा शब्दात एफटीआयआयचे संदीप शहारे यांनी ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा गौरव केला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची वाटचाल विद्यार्थीकेंद्री असून, अभ्यासू कष्टाळू गुणवंत कलावंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी विद्यापीठ सदैव आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे विद्यापीठाचे ध्येय आहे, असे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर विद्यार्थ्यांशी वार्तालाप करताना म्हणाले.
‘विद्यार्थ्यांशी संवाद’ या उपक्रमास कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखाधिकारी महोम्मद शकील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाचे संचालक मेघ वर्ण पंत, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, एक्यूआयसीचे संचालक डॉ. सुरेंद्र रेड्डी, डॉ. महेश जोशी, डॉ. सचिन नरंगले, प्रा. साक्षी आर्या, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. राहुल गायकवाड यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
हाय टी विथ व्हाइस चांसलर…
देशभरातून उपस्थित विद्यार्थ्यांसाठी हाय टी विथ व्हाईस चान्सलर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने कुलगुरूंशी संवाद साधला.