धुळयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित विद्यार्थी – पालक कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांर्तगत कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळामध्ये सुरू झालेल्या नवीन पदवी अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी शनिवारी धुळे येथील एम डी पालेशा महाविद्यालयात घेण्यात आलेल्या “विद्यार्थी-पालक” कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन या अभ्यासक्रमांची व भविष्यातील करीअरच्या संधीची माहिती घेतली.
विद्यापीठाने या वर्षी प्रथमच अशा प्रकारची पालक व विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. विद्यापीठात व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत बी कॉम (बीएफएसआय), भौतिकशास्त्र प्रशाळेत बी एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) हे दोन नाविन्यपुर्ण चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांर्तगत हे सर्व अभ्यासक्रम सुरु आहेत. त्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ शिवाजी पाटील, अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे, धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे यांनी यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, सोयीसुविधा, विद्यापीठाची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ प्रभाकर महाले यांनी प्रास्ताविक केले. प्रा जयदीप साळी यांनी बी एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) या अभ्यासक्रमाविषयी तर प्रा रमेश सरदार यांनी बी कॉम (बीएफएसआय) या अभ्यासक्रमाचे महत्व व भविष्यातील संधी याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले.
प्रा बी एस काळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ हेमंत जोशी यांनी आभार मानले. यावेळी धुळे शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच प्राधिकरणांचे सदस्य यांची उपस्थिती होती.