राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात विद्यार्थी निरोप समारंभ संपन्न
सर्वात उंच उडान भरा – डॉ माधवी खोडे चवरे
नागपूर : इतरांसोबत तुलना न करता सर्वात उंच उडान भरा, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात विद्यार्थी निरोप समारंभ ‘उडान’ तसेच महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम शुक्रवार, दि ११ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. यावेळी कुलगुरू अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होत्या.




विभागाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे यांनी भूषविले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जांभुळकर यांची उपस्थिती होती. तुमचे विचारच तुमची उडान निश्चित करणार असल्याचे कुलगुरूंनी पुढे बोलताना सांगितले. पदवीनंतर आपण राज्यशास्त्र विषयाची का निवड केली, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उपस्थित केला.
संघ लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देताना, करिअरची निवड करताना या विषयाचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. आपण जे करतो त्याचा अर्थ समजला पाहिजे. प्रत्येक विचारांमध्ये विचार असतो, असे देखील त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात स्पष्टता असली पाहिजे. स्पष्टता ही शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचा वेळ सर्वात महत्त्वाचा असून समाज माध्यमांवर वेळ घालवण्याऐवजी करियर करण्याच्या दृष्टीने वेळेचा सदुपयोग करा, असे कुलगुरू म्हणाल्या.
मनोगत व्यक्त करताना मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी निरोप समारंभ हा निरोप नव्हे तर आरंभ असल्याचे सांगितले. राज्यशास्त्र विषयाला करियर म्हणून निवड का करावी याबाबत विविध बाबी त्यांनी सांगितल्या. प्रास्ताविक करताना डॉ विकास जांभुळकर यांनी उडान या शब्दाचा अर्थ उलगडून सांगितला. राज्यशास्त्र विभागातून विद्यार्थ्यांनी सक्षम होत उंच झेप घ्यावी, असे सांगितले. तत्पूर्वी कुलगुरूंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा किशोर नैताम यांनी केली तर आभार डॉ प्रमोद कानेकर यांनी मानले.
कुलगुरूंच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण होत विभागाचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यामध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले वैभव मेश्राम, अंजली मेश्राम, इशिका पिंपळकर तसेच युथ पार्लमेंटमध्ये क्रमांक प्राप्त करणारी सिमरन थूल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.