गोंडवाना विद्यापीठाच्या ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
‘एबीसी-आयडी’ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संपत्ती – राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रा डॉ विनोद कुकडे यांचे प्रतिपादन
मुलचेरा : विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. त्यानुसार महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शैक्षणिक क्रेडीट बँक खाते तयार करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती साठवून ठेवता येणार आहे. कुठेही बाहेर पडताना कागदपत्रांची फाईल घेऊन जाणे यापुढे गरजेचे राहणार नाही, तर शैक्षणिक क्रेडीट बँकमधील कागदपत्रच ग्राह धरल्या जाणार आहे. यासोबतच त्याचे शैक्षणिक कामासाठीही मोठे फायदे असल्याने ‘एबीसी-आयडी’ ही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने शैक्षणिक संपत्ती आहे. असे प्रतिपादन सहयोगी प्राध्यापक डॉ विनोद कुकडे यांनी केले.

येथील नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय एक दिवशीय कार्यशाळेत ते साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंजीत मंडल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक तथा कार्यशाळा समन्वयक डॉ सुरेखा हजारे, राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय मुरकुटे, नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा कार्यशाळा सहसंयोजक डॉ सचिन शेंडे, प्रा गौतम वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ कुकडे म्हणाले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यकाळात मिळालेले क्रेडीट साठवून ठेवण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या ‘पीएम-उषा’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एबीसी आयडीचे महत्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. याचा फायदा विदद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चा बारा अंकी एबीसी आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. सत्र पद्धतीत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेवर कशा पद्धतीने गुणदान करण्यात येते. तेथील क्रेडीट कशी मोजली जाते, यावरही डॉ कुकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंडल यांनीही एबीसी आयडीवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ सुरेखा हजारे यांनी केले. संचालन प्रा गौतम वाणी तर आभार डॉ सचिन शेंडे यांनी मानले. या कार्यशाळेला स्व मलय्याजी आत्राम महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.