दत्ता मेघे विद्यापीठात बधिरीकरणशास्त्रावर दोन दिवसीय राज्य परिषदेचे आयोजन
सोसायटी ऑफ ॲनास्थेसियोलॉजिस्ट्स व मेघे अभिमत विद्यापीठाचे आयोजन
सावंगी येथे बधिरीकरणशास्त्रावर दोन दिवसीय राज्य परिषद
वर्धा : सोसायटी ऑफ ॲनास्थेसियोलॉजिस्ट्स, वर्धा शाखा आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने बधिरीकरणशास्त्राच्या स्नातकोत्तर विद्यार्थ्यांसाठी पीजीकॉन २०२४ राज्य परिषद दि १० व ११ ऑगस्ट रोजी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ, सावंगी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सोसायटी ऑफ ॲनास्थेसियोलॉजिस्ट्स, महाराष्ट्र राज्यअंतर्गत आयोजित या परिषदेला महाराष्ट्रातील विविध भागातून स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि भूलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या सहभागींना त्यांचे शोधनिबंध आणि पोस्टर्सचे सादरीकरण करण्याची संधी या परिषदेत प्राप्त होईल. याशिवाय, ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे बधिरीकरण शास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय ज्ञान या परिषदेतील विविध सत्रात प्राप्त होणार आहे.
बधिरीकरणशास्त्राचा अभ्यास व संशोधनाला चालना देणे, व्यावसायिक वाढीस प्रेरणा देणे तसेच पिढीतील भूलतज्ज्ञांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करणे, या उद्देशाने सोसायटी ऑफ ॲनास्थेसियोलॉजिस्ट्स वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ विजय चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ संजोत निनावे, सचिव डॉ नीता चौधरी व ज ने वैद्यकीय महाविद्यालयातील ॲनास्थेसियोलॉजी विभाग प्रमुख डॉ विवेक चकोले यांच्या नेतृत्वात या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
बधिरीकरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व अभ्यासकांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.