डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘स्टार्टअप यात्रा’ चा शुभारंभ
मंत्री मंगलप्रभात लोढा करतील उद्घाटन – परिसंवादासही राहणार उपस्थित
छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एआयसी-बामू फाऊंडेशन’ तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘बामू स्टार्टअप यात्रा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता मंत्री मा. ना. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत सिफार्ट सभागृह, बजाज इन्क्युबेशन सेंटर येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभास मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी, डीडीयुके संचालक डॉ. भारती गवळी, संचालक डॉ. प्रवीण वक्ते, एम.डी. मुकुंद कुलकर्णी व सीईओ अमित रंजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात मा. मंत्री ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय : एकात्म मानव दर्शन’ या परिसंवादातही सहभागी होतील.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेची संधी
‘बामू स्टार्टअप यात्रा’ ही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनविण्यासाठी तयार केलेली बहुपर्यायी योजना आहे.
या यात्रेचे टप्पे पुढीलप्रमाणे असतील –
- आयडिया जनरेशन (सप्टेंबर–नोव्हेंबर 2025): महाविद्यालयांत जागरूकता शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना सामुदायिक-केंद्रित कल्पना ऑनलाइन सादर करण्यास प्रोत्साहन.
- मेंटरशिप व रिफाइनमेंट (डिसेंबर 2025–फेब्रुवारी 2026): निवडलेल्या कल्पनांचे मार्गदर्शन व परिष्करण.
- प्रोटोटाइप व पिच तयारी (मार्च–मे 2026): संकल्पनेपासून प्रोटोटाइप व अंतिम सादरीकरणाची तयारी.
- पिचिंग व ग्रँड फिनाले (जून–ऑगस्ट 2026): विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे सादरीकरण आणि निवड.
- पोस्ट-यात्रा सपोर्ट (सप्टेंबर 2026 पासून): निवडलेल्या कल्पनांना टिकाऊ उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सहाय्य.
या उपक्रमाची अधिकृत सुरुवात ‘बामू स्टार्टअप यात्रा डॅशबोर्ड आणि पोर्टल’ च्या लोकार्पणाने होईल, ज्याद्वारे संलग्न महाविद्यालये आणि विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतील. त्याच दिवशी मा.ना. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते स्टार्टअप यात्रा बसला हिरवा झेंडा दाखवून जागरूकता अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल.
विद्यापीठाशी संलग्न सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.
