शिवराज्याभिषेक -३५०’ निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
शिवाजी कॉलेज परभणी चा किशन जाधव विजेता
नांदेड : कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे अध्यक्षस्थानी होते तर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, व्यवस्थापन परिषद सदस्य हनुमंत कंधारकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखंड हिंदुस्थानचे ऊर्जा केंद्र असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरक विचार आणि कार्य आजच्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन निकोप समाजासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी तरुणांनी आपल्या आयुष्याची पायाभरणी करावी अशा पवित्र हेतूने छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याचा जागर व्हावा याकरिता विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी विद्यापीठाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
दि. २१ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहामध्ये आंतरमहाविद्यालयीन विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि शिवचरित्रापासून आपण काय शिकावे? लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि शककर्ते शिवराय या विषयावरती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना सर्वधर्म सहिष्णू असणाऱ्या, स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी विश्रांत झिजणाऱ्या या राजाची आज समाजाला आणि व्यवस्थेला किती गरज आहे हे सांगताना लोककल्याणकारी राष्ट्रनिर्माणासाठी छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून केले.
किशन शिवाजी जाधव (श्री शिवाजी महाविद्यालय परभणी) यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर कृणाल बेद्रे (शिवाजी विधी महाविद्यालय परभणी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, प्रीतम रेवते (चन्न बसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूर) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर बुशरा शेख (श्री शिवाजी कॉलेज कंधार), गीता वाडकर (महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा), मिलिंद वाघमारे (स्त्री अध्ययन केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५,००० रू., ३,००० रू. व २,००० रू. रोख बक्षीस सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. केशव देशमुख, एडवोकेट राजा कदम, किरण देशमुख यांनी काम पाहिले.
स्पर्धा समन्वयक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप काळे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन करून आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय पवार, डॉ. बालाजी जाधव, प्रा. गजानन इंगोले कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेला विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.