”स्वारातीम” विद्यापीठात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांचे यश हेच पालकांच्या कष्टाचे फलित – कुलगुरू डॉ मनोहर चासकर
नांदेड : जगातल्या प्रत्येक आई-बाबांची इच्छा असते ती आपल्या पाल्यांचा सत्कार आपल्या डोळ्यांनी बघण्याची. तो सत्कार बघातांना आपल्या जीवनात केलेल्या कष्टाचे फलित मिळाल्यासारखे प्रत्येक मुला-मुलींच्या आई-वडिलांना वाटत असते. आई-वडील दिवसरात्र कष्ट घेवून मुला-मुलींना शिकवतात पण त्या कष्टाचे खरे फलित हे आपले पाल्य यशस्वी झाल्यावरच होते. म्हणून विद्यार्थ्यांचे किंवा मुला-मुलींचे यश हेच पालकांच्या कष्टांचे फलित असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी वक्त केले.
ते दि १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासनाद्वारे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील संकुलामधून जे विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’, ‘गेट’, जि-पॅट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ इत्यादी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा पालकासह कुलगुरू यांनी गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. विद्यापीठाचा इतिहासात पहिल्यांदाच या वर्षी १३८ विद्यार्थ्यांनी ‘नेट’, ‘सेट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये येवढे मोठे यश मिळवले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, वित्त व लेखा अधिकारी शकील महमद, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ सिंकू कुमार सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पराग खडके, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ शैलेश वाढेर उपस्थित होते.
पुढे कुलगुरू डॉ चासकर म्हणाले जगामध्ये शिक्षक आणि पालक हे दोनच व्यक्ती असे असतात ज्यांना आपली मुलं घडवितांना कुठलीही अपेक्षा नसते. शिक्षक ज्ञानार्जन करताना आपले विद्यार्थी घडावेत, मोठे व्हावेत एवढी स्वप्न ठेवून असतात. तर पालक आपल्या मुला-मुलींना जास्तीत जास्त चांगले शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत असतात. हा सत्कार फक्त विद्यार्थ्यांचा नसून त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षकांना आणि पालकांना कधीही विसरू नये, असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
सर्व प्रथम प पू स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर उपस्थित पालकांमधून प्रतिनिधी स्वरूपात पालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ अविनाश कदम यांनी केले.
याप्रसंगी गणितीयशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूशास्त्र, भाषाशास्त्र, शिक्षणशास्त्र, जैवशास्त्र, सामाजिकशास्त्र, माध्यमशास्त्र, ललित व प्रयोगजीवी कला, उपपरिसर परभणी सह विविध संकुलाचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.