स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
मराठी भाषा विकासासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
नांदेड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले असून आगामी काळात उच्चशिक्षणात मराठीचा टक्का वाढणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यास सुरुवात झाली आहे. तथापि मराठी भाषेच्या सर्वंकष विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
विद्यापीठात भाषा संकुलाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. चासकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, भाषा संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, एनएसएसचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. शैलजा वाडीकर, मराठी विभागातील डॉ. पी विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, उपकुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, डॉ. नीना गोगटे यांची उपस्थिती होती.
विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या वाङ्मयीन कार्याचे विवेचन करत विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांनी मराठी भाषेतून लेखन करुन ज्ञाननिर्मिती केली पाहिजे, असे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी यावेळी सर्व उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी विभागातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘मराठी भाषा गौरव’ या भीतीपत्रकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. रेणुका व्यवहारे, अपर्णा काचकोंडे, संध्या बेद्रे, सुनंदा एंगडे यांनी संपादित केलेल्या भितीपत्रकाचे कुलगुरूंनी विशेष कौतुक केले व विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.