उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सृष्टी संवर्धन शिबिराचे उत्साहात समारोप

जळगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास होतो, नेतृत्व घडण्यासाठी मदत होते आणि सामाजिक भान निर्माण होते असे प्रतिपादन खा स्मिताताई वाघ यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सृष्टी संवर्धन शिबिराच्या समारोपात केले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विभागाच्या वतीने दि. १ते ७ जुलै या कालावधीत विद्यापीठस्तरीय कुलगुरू उन्हाळी शिबीर (सृष्टी संवर्धन – २०२४) पार पडले या शिबीराचा समारोप रविवारी खा. स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी प्र- कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्य प सदस्य राजेंद्र नन्नवरे व अॅङ अमोल पाटील, अधिसभा सदस्य अमोल मराठे व स्वप्नाली महाजन-काळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खा स्मिताताई वाघ म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनात मी रा.से.यो. माध्यमातून काम केले आहे. जळगावातील हरी विठ्ठल नगरात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे हुंडाबळी बाबत सर्व्हेक्षण करण्यात आले होते त्यामध्ये माझा सहभाग होता. अशा शिबिरांचा व्यक्तीमत्त्व विकासासाठी आणि नेतृत्व घडण्यासाठी उपयोग होत असतो.

Advertisement

या शिबीरातून जे शिकायला मिळाले त्याचा उपयोग समाजासाठी करावा वैयक्तिक पातळीवर चार झाडे लावून त्याची निगा राखा. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली तर त्या शिबिराचे यश राही असे त्या म्हणाल्या. या विद्यापीठाशी स्थापनेपासून कार्यकर्ता, त्यानंतर अधिसभा सदस्य म्हणून नाते राहिलेले आहे. त्यामुळे भविष्यात दिल्लीत विद्यापीठासंदर्भात ज्या अडचणी असतील त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न खासदार या नात्याने निश्चितच केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा माहेश्वरी यांनी ज्ञान आणि क्षमता यांचा अहंकार न बाळगता अभिमान बाळगा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. आपल्या भाषणात कुलगुरूंनी टी-२० वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने विश्वविजेते पद प्राप्त करतांना जी सांघिक भावना संघाने जोपासली त्याचे उदाहरणे देत स्पष्टीकरण दिले. अपयश आले तर उणिवांवर काम करा आणि ध्येय गाठा. यश मिळाल्यानंतर पुढील उद्दीष्ठे निर्धारित करा असे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे राजेंद्र नन्नवरे यांनी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी सृष्टी संवर्धनासाठी काम करावे असे आवाहन केले. वैयक्तिक पातळीवर आपल्याला जे जे शक्य आहे ते करावे असे ते म्हणाले. खा स्मिताताई वाघ यांचे विद्यापीठाशी जवळचे नाते आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत विद्यापीठाच्या राजदूत म्हणून काम करावे अशी अपेक्षा नन्नवरे यांनी बोलून दाखविली. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविकात आठवडाभराच्या शिबिराचा आढावा घेतला. यावेळी कृष्णा हाटे, हेमंत खेडकर, घन:श्याम पाटील, निलम कुंवर व यामिनी गुरव या विद्यार्थ्यांनी तसेच संघ व्यवस्थापकांतर्फे प्रा मनिष करंजे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिनेश पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page