अमरावती विद्यापीठाच्या आंतर शैक्षणिक विभागीय क्रिकेट स्पर्धेत श्री साई सेक्युरिटी संघ विजेता
विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आयोजित आंतर शैक्षणिक विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री साई सेक्युरिटी संघ विजेता ठरला. या स्पर्धेमध्ये शैक्षणिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक, सुरक्षा कर्मचारी यांच्या 16 संघांनी भाग घेतला. अंतिम सामना श्री साई सेक्युरीटी विरुद्ध फिजिक्स विभाग यांच्यात झाला. यात श्री साई सेक्युरिटी संघ विजेता ठरला.
स्पर्धेत चैतन्य संतोश्वर याने 104 धावा काढून उत्कृष्ट फलंदाज, तर उत्कृष्ट गोलंदाज ललित गावंडे याने 7 विकेट्स घेतल्या. 72 धावा आणि 4 विकेट्स घेऊन सतीश आठवले हा मालिकावीर ठरला. मान्यवरांच्या हस्ते विजेता संघ श्री साई सेक्युरिटीला प्रथम, फिजिक्स विभागास द्वितीय चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे मुख्य अतिथि म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे, डॉ. अविनाश बोर्डे उपस्थित होते. डॉ. विजय नागरे यावेळी बोलतांना म्हणाले, अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांना मानसिक बळ मिळते. प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाकौशल्य विकसित व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनीही यावेळी खेळाडूंनी दाखविलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली.
संचालन माधुरी सासंकर व समा लीवा यांनी, स्पर्धेचा अहवाल कुणाल जोत यांनी दिला. याप्रसंगी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, निलेश इंगोले, सौरभ त्रिपाठी, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.