श्री शिवाजी महाविद्यालयातील कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
बी रघुनाथ स्मृतिदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचा उपक्रम
परभणी : थोर साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहन कुलकर्णी होते. तर मसाप शाखेच्या अध्यक्ष कथा लेखिका सरोज देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कवी संमेलनात शिवाजी मरगीळ, डॉ केशव खटींग, महेश देशमुख, श्यामसुंदर धोंडगे, आत्माराम जाधव, सय्यद चांद, राही कदम, माधव हैबतकर, सुवर्णा मूळजकर, सोपान डोके, अमोल देशमुख, यशवंत मस्के, मधुरा उमरीकर, मोहन कुलकर्णी, भानुदास धोत्रे, प्रा प्रल्हाद भोपे, मारुती डोईफोडे, अविनाश कासंडे, बबन आव्हाड, रवी कात्नेश्वरकर,साक्षी कदम, निकिता आसेवार, विकास दळवे या कवींनी जगावे कसे, बाल विवाह, शिवबा, बांडगुळ, बाई, मता पुरताच मराठवाडा, चार कविता, वृक्ष, प्रेम, सामाजिक बांधीलकी, पाऊस या विविध विषयावरील कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आत्माराम जाधव यांनी “काजळासारखा रंग माझा तरी माय माझी मला तीट लावायची” ही माईचं प्रेम व्यक्त करणाऱ्या या गझलेने, अविनाश कासंडे यांनी ‘कधीकाळी कुण्या कंठातला मी आरसा होतो’ या गझलेने तर सोपान डोके यांनी “दुःख जेव्हा काळजाला फार होते जेव्हा गझल माझी आधार होते” या गझलेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. “उसालाही घाम फोडणाऱ्या जिंदगी चिवटी झालेल्या टोळीतल्या बाया घणाला लयीत फिरवून आगजाल लोखंडाला नीट करणाऱ्या पण डोक्यावर छप्पर नसलेल्या उघड्या जिंदबाज बाया” स्त्री जीवनाची व्यथा सांगणारी कविता डॉ केशव खटिंग यांनी सादर केली.
“कुणब्याच्या डोईवरी फाटलं आभाळ रं असा कसा नशिबावर कोसळतो काळ रं” महेश देशमुख यांच्या या कवितेने अवकाळी पावसाने पिकं उध्वस्त झाल्या नंतरची शेतकऱ्यांची वेदना व्यक्त केली. ‘माझी नवी वसाहत’ या कवितेतून मारूती डोईफोडे यांनी शहरीकरणाचे वास्तव चित्र व्यक्त केले. यावेळी पीएचडी पदवी प्राप्तीबद्दल सुरेश हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज देशपांडे यांनी सुत्रसंचलन डॉ सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा भगवान काळे यांनी केले. कवी संमेलनात गझलकार दिवंगत सतीश दराडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख डॉ प्रल्हाद भोपे, डॉ राजू बडूरे, प्रा सारिका पासंगे, प्रा अंकुश खटींग, प्रा मयुरी शिंदे, मराठी वाडमय मंडळ अध्यक्ष निकिता लोंढे, पक्षीमित्र लेखक माणिक पुरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, श्रोते उपस्थित होते.