राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नागपूर फिल्म फेस्टिवलला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूरकरांनी घेतला ‘फिल्म स्क्रीनिंग’चा आनंद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नागपूर फिल्म फेस्टिवल’मध्ये नागपूरकरांनी ‘फिल्म स्क्रीनिंग’चा आनंद घेतला. चित्रपट महोत्सवात सहभागी काही निवडक लघुपटांचे विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी स्क्रीनिंग करण्यात आले.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील राजकपूर सभागृहात बालकांवर आधारित मैं निदा हा चित्रपट दाखविण्यात आला त्यानंतर दिग्दर्शक अतुल पांडे यांनी याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे दिग्दर्शक श्री मिलिंद लेले यांनी ‘सिनेमा संस्कृति का दर्पण’ या विषयावर विद्यार्थी व उपस्थित प्रेक्षकांसोबत संवाद साधला. या चर्चासत्रात मिलिंद लेले यांनी सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संस्कृति पोहचवण्याचे काम चित्रपट करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पटकथा चांगली असली तर सिनेमाही चांगला असतो. इतर भाषिक सिनेमाच्या तुलनेत हिंदी सिनेमा हे ग्लॅमरल होत चालले असून त्यांच्यात वास्तविकता नसल्याने ते लोकांच्या पसंतीस उतरत नसल्याचे देखील लेले म्हणाले.
गणित विभागातील श्याम बेनेगल सभागृह (रामानुजन सभागृह ) येथे विविध भाषेतील ०९ लघु चित्रपटाचे प्रदर्शन डिजिटल स्क्रीनवर करण्यात आले. लघु फिल्म प्रदर्शनामध्ये तवामेवा सर्वाम, काव-काव, एस सर, खोपा, डोब्या, ‘एक दोन तीन चार’, अंमयू काढू, या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या लघु चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी समाजात सुरू असलेल्या ग्रामीण-शहरी स्थलांतरण, गोहत्या, शेतकऱ्यांची आणि जनावरांची जुळलेली नाळ, शेतीचे महत्व अशा अनेक सत्य घटनेवर आधारित विषयावर सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
औषधी निर्माणशास्त्र विभागातील मोहम्मद रफी (डॉ. एस.के. डोरले सभागृह) सभागृहात लघु चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, हरियाणी, बंगाली अशा चार भाषेतील लघु चित्रपटांचा समावेश होता. लघु चित्रपटांमध्ये दुसार ब्रिस्टी, तलवार, विटा, नचार, आब्रू, निर्जरा, खो, अलार्म घडी, धोंडी, फुल, एक्सेल हंड्रेड, क्षुधा, रिबेल, कंट्रोल, लापता, चप्पल, अशा प्रकारे एकूण १६ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. समाजातील समस्या, सत्य घटनेवर आधारित तसेच काही काल्पनिक चित्रपटांचा देखील समावेश होता.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील (पहिला माळा) प्रभा अत्रे सभागृह येथे लघु चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये एकूण ९ लघु चित्रपट दाखविण्यात आले यामध्ये अभय मिश्रा (दिल्ली) दिग्दर्शित हलमा – इट्स टाइम टू कॉल, कर्नाटक येथील प्रवीण शेट्टी और नितेश अंचन दिग्दर्शित कन्नड आणि तुलु भाषिक तुलुनाडु की भूताराधने (जीवित संस्कृतियाँ), दिल्ली येथील राहुल यादव (हिंदी) प्रणाम काशी, प्रवीण आर. देथे दिग्दर्शित घास का मैदान, गुजरात येथील प्रशांत कुशिकर दिग्दर्शित इंग्रजी लघुपट मशरूम, अक्षय मधुमटके (मराठी) दिग्दर्शित वाशिम सामाजिक न्याय विभागाची फिल्म, उत्तर प्रदेशातील आशिष कुमार पांडे दिग्दर्शित भोजपुरी लघु चित्रपट वातांगिया – “जंगलाचे प्रतिध्वनी”, पंजाब येथील मोहन सिंग औलख दिग्दर्शित पंजाबी लघुपट बेकायदेशीर खाणकाम, सृष्टी लोखंडे दिग्दर्शित सपेरा समाज चित्रपट यांचा समावेश होता.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील राजकपूर (सिनेट सभागृह) सभागृह येथे बालकांकरिता चित्रपट दाखविण्यात आले. यामध्ये उत्तर प्रदेश येथील हिंदी भाषेतील केतन क्षीरसागर दिग्दर्शित आनंदाचे रोप, महाराष्ट्रातून हिंदी भाषेतील सीमा सपकाळ दिग्दर्शित बोझ, गुजरात येथून गुजराती भाषेतील वेदांत आचार्य दिग्दर्शित वाघ, हरियाणा येथून हिंदी हरियानवी भाषेतील प्रदीप दिग्दर्शित बस्ता आणि महाराष्ट्रातून मराठी भाषेतील रशीद निंबाळकर दिग्दर्शित किरण या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्यात आला. चित्रपट बघण्याकरिता नागपूरकरांनी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.