महाराष्ट्र राज्य संस्कृत शास्त्र स्पर्धेत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या चमूची नेत्रदीपक कामगिरी
रामटेक : नवी दिल्ली स्थित केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या विद्यमाने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात महाराष्ट्र राज्यस्तरीय शास्त्र स्पर्धेचे आयोजन रामटेक येथे नुकतेच करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये व्याकरणशलाका, वेदान्तशलाका, जैनबौद्धभाषण, धातुरूपकण्ठपाठ, साहित्यशलाका, साहित्यभाषण, धर्मशास्त्रभाषण, काव्यशलाका, समस्यापूर्ती, अक्षरश्लोकी इ. विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या विकासात प्राचीन शास्त्रपरंपरेचे अन्यन्यसाधारण स्थान आहे. या शास्त्रपरंपरेचे जतन करण्यासाठी संस्कृत विद्यापीठ कटिबद्ध आहे. शास्त्रअध्ययनासह शास्त्र-कण्ठस्थीकरण शास्त्रशलाकापरीक्षा, शास्त्रभाषण इ. पारंपरिक स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे व त्यांना सहभागाची संधी उपलब्ध करुन देणे यासाठी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी निरंतर परिश्रम घेतात. याचेच फळ नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य संस्कृत शास्त्र स्पर्धेच्या निमित्ताने समाजापुढे आले. विभिन्न 32 शास्त्रीय स्पर्धामध्ये विश्वविद्यालयाच्या 26 विद्यार्थ्यांनी सहभाग तर नोंदविलाच आणि त्यातील 15 विद्यार्थ्यांनी आपल्या शास्त्रज्ञानाच्या बळावर व प्रतिभाशक्तीच्या जोरावर या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर 3 विद्यार्थ्यांनी दुसरा कमांक पटकावून नेत्रदीपक कामगिरी केली. विशेष म्हणजे प्रथम कमांक प्राप्त सर्व विद्यार्थी मार्च मध्ये प्रभु श्रीरामचंद्रांच्या साकेत नगरीत म्हणजे अयोध्येत केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फे संपन्न होणा-या राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय शास्त्रीय स्पर्धेत आपले शास्त्रनैपुण्य सादर करतील.

रामटेक परिसर संचालक प्रो. हरेकृष्ण अगस्ती, शास्त्रविद्यागुरुकुलम् चे संचालक डॉ राघवेंद्र भट आणि छात्र कल्याण संचालक डॉ. जयवंत चौधरी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ही चमू या स्पर्धामध्ये सहभागी झाली होती. या विविध स्पर्धापैकी वेदान्तभाषण मध्ये हर्षल बांगडे, जैनबौद्धभाषण मध्ये कृतिका जैन, व्याकरणभाषण मध्ये सिमरन ठाकुर, धर्मशास्त्रभाषण मध्ये गौरी पाठक, ज्योतिषभाषण मध्ये सानिया बावने, आयुर्वेदभाषण मध्ये संचिता पाठक, व्याकरणशलाका मध्ये शर्वरी शास्त्री, ज्योतिषशलाकामध्ये श्रीपाद बेलदार, अर्थशास्त्रशलाकामध्ये अभिराम गदाधर, काव्यशलाकामध्ये अथर्व भारद्वाज, अमरकोषकण्ठपाठमध्ये पूर्वा, धातुकण्ठपाठ मध्ये नुपूर कुलकर्णी, शास्त्रीयस्फूर्ती मध्ये सिमरन ठाकूर व प्रियांशु, अक्षरश्लोकीमध्ये अश्विनी बावने यानी प्रथम कमांक प्राप्त केला. साहित्यशलाका मध्ये आदर्श तिवारी, काव्यकंठपाठ मध्ये प्रचिती वखरे, भारतीयविज्ञानभाषण मध्ये वेदांशी पटेल यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला
समारोप समारोहामध्ये मा. अधिष्ठाता प्रो. कविता होले, प्रो. हरेकृष्ण अगस्ती, प्रो. प्रसाद गोखले, पूर्व अधिष्ठाता प्रो नंदा पुरी व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्याचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. विविध स्पर्धामध्ये विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सखोल शास्त्रीय ज्ञानाचे प्रदर्शन अतिशय आत्मविश्वासाने सादर केले. त्याचे परीक्षकांनीही कौतुक केले. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी “शास्त्रजतनात युवापिढीचे योगदान आता काळाची गरज आहे व ते या स्पर्धेतील प्रावीण्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपली शास्त्रनिष्ठा सिद्ध करून विश्वविद्यालयाला गौरव प्राप्त करून दिला आहे” अशा शब्दात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांनी विजयी चमूचे अभिनंदन केले आहे.