महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न

संविधान हे आधुनिक भारताचे सर्वोत्तम लेखन – कुलगुरू प्रो सिंह

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात मंगळवारी, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह म्हणाले की संविधान हे आधुनिक भारताचे सर्वोत्तम लेखन आहे. संविधान बनवताना विद्वान लोकांनी अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन संविधान तयार केले. डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. त्या वेळी ते म्हणाले होते की आम्ही विरोधाभासाच्या नव्या युगात प्रवेश करणार आहोत. त्यांनी आर्थिक आणि सामाजिक विषमता आणि असमानतेबद्दल इशारा दिला होता. आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. या समस्यांना सामोरे जावे लागेल. नव्या पिढीकडून अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की समाजात समानता यावी यासाठी काम केले पाहिजे.

प्रमुख पाहुणे म्‍हणून विधी सेवा प्राधिकरण, वर्धेचे सचिव न्यायमूर्ती विवेक देशमुख म्हणाले की संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. या कायद्यांद्वारे नागरिक आपल्‍या हिताचे रक्षण करू शकतात. संविधानात दिलेले अधिकार हे आम्हाला आमचे हक्क देण्यासाठी ढाल म्हणून काम करतात. आपण आपले कर्तव्य समजून संविधानानुसार काम केले पाहिजे. ते म्हणाले की संविधानात अंतर्भूत असलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची भावना आपल्या संस्कृतीत आहे. आपली राज्यघटना जितकी लवचिक तितकीच ती कठोर आहे.

Advertisement

कुलसचिव प्रो आनन्‍द पाटील म्हणाले की संविधानाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आमच्यासाठी संविधान हे एक धर्मग्रंथ म्‍हणून आहे. 2015 पासून संविधान दिन साजरा करण्‍याच्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले आणि या निमित्ताने आपण संविधान जाणून आणि समजून घेतले पाहिजे असे ते म्‍हणाले.

यावेळी विधी विद्यापीठातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण विद्यार्थ्‍यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संविधान कार्यक्रम आयोजनाचे नोडल अधिकारी असोशिएट प्रोफेसर डॉ बालाजी चिरडे यांनी केले. स्‍वागत भाषण विधी विद्यापीठाचे अधिष्‍ठाता प्रो जनार्दनकुमार तिवारी यांनी केले तर विधी विभागाचे अतिथी शिक्षक डॉ युवराज खरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात कुलगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. कस्तुरबा सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिक्षक, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page