100 कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार – कुलगुरू प्रा महानवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला ‘पीएम उषा योजने’चा शुभारंभ
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे विकसित भारत होत आहे, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून दर्जेदार उच्च शिक्षण, संशोधन तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ घडविणार असल्याचा संकल्प कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला. जम्मू येथून नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानाचा शुभारंभ केला. त्याचे थेट प्रक्षेपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दाखविण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, महेश माने, मोहन डांगरे, दादा साळुंखे, डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. विकास घुटे यांनी प्रास्तविक केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, प्रधानमंत्री उच्च अभियानाच्या निधीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या विविध संकुलांसाठी इमारत, नवीन अभ्यासक्रम, संशोधन उपकरणे व सामुग्री, विविध अभ्यासक्रमांसाठी लॅबोरेटरी त्याचबरोबर विद्यार्थी व फॅकल्टीसाठी हॉस्टेल, पायाभूत सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे निश्चितच विद्यापीठाचा चौफेर विकास होण्यासाठी शंभर कोटी निधीचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास हा निधी मंजूर केल्याबद्दल कुलगुरू प्रा. महानवर यांनी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी, योजनेचे राज्य समन्वयक डॉ. विनायक निपुण, डॉ. प्रमोद पाबरेकर आदींचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी आभार मानले.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे व अन्य.