पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘मतदार जनजागृती’ व्याख्यानाचे आयोजन

मतदान हे हक्क नसून लोकशाही जपण्याचे प्रभावी साधन : डॉ. केदारनाथ काळवणे

सोलापूर : भारत हा लोकशाही मूल्यांनी समृद्ध देश आहे. ही लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे. मतदान हे केवळ हक्क नसून लोकशाही जपण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागपी.एम.-उषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय ‘मतदार जनजागृती’ व्याख्यान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुजाण, जागरूक व जबाबदार मतदार घडवून लोकशाही अधिक मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Solapur University voter awareness lecture by Dr Kedarnath Kalavane
Solapur University voter awareness lecture by Dr Kedarnath Kalavane

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मार्गदर्शन करताना भारतीय लोकशाहीची मूलभूत मूल्ये, मतदानाचा हक्क व कर्तव्य, तसेच युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले. तरुण पिढीने मतदानाकडे केवळ अधिकार म्हणून न पाहता सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहावे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजीवकुमार मेंते (संचालक, संगणकशास्त्र संकुल) होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची नितांत गरज असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.

कार्यक्रमात मतदान प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज, मतदार नोंदणीचे महत्त्व तसेच लोकशाहीतील युवकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘माझे मत – माझा अधिकार’ या संदेशाला विशेष अधोरेखित करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com