सोलापूर विद्यापीठाची पीएचडी प्रवेशपूर्व पेट-9 परीक्षा 21 जुलैला
गुरुवारपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार
यंदा प्रथमच ऑनलाइन ‘ॲन्ड्राईड वेब’द्वारे परीक्षा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पीएचडी प्रवेशपूर्व पेट-9 परीक्षा 21 जुलै 2024 रोजी होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी दिली. यंदा प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून ॲन्ड्राईड वेब बेस्ड पद्धतीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही पेट-9 परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडून पीएचडी प्रवेशासंदर्भात प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएचडीसाठी प्रवेश घेण्यासंदर्भात सुरुवातीला पेट परीक्षा (एंट्रन्स एक्झाम) विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. याकरिता 13 जून ते 6 जुलै 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. यंदा ही परीक्षा ऑनलाइन अँड्रॉइड बेस्ड पद्धतीने होणार असल्याने परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पेट’ देता येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी ‘पीएचडी’ च्या जवळपास 474 जागा असणार आहेत. विषयनिहाय संशोधक मार्गदर्शकांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘पेट’साठी दोन पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या ॲन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही परीक्षापरीक्षा देता येणार आहे. पण, कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे.
पेट परीक्षा देण्यासाठी 6 जुलैपर्यंत अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांची 18 ते 20 जुलै 2024 दरम्यान पूर्व तयारीची ऑनलाइन मॉक टेस्ट होणार आहे. याचबरोबर एका विषयातून ‘पेट’ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 21 जुलैला परीक्षा देता येणार आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा 22 जुलैला होणार आहे.
कोर्स वर्क परीक्षेचेही आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित संशोधन केंद्र, महाविद्यालय व संकुलांमधील शैक्षणिक वर्ष 2022-23 व 2021-22 मधील पेट-7 व पेट-8 प्रवेशित विद्यार्थ्यांची पीएचडी कोर्स वर्कची परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी 25 जून 2024 पर्यंत परीक्षा अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन माध्यमातून सदरील परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येत आहे. सदरील कोर्स वर्क परीक्षेची अधिक माहिती संकेतस्थळ व संबंधित संशोधन केंद्रावर उपलब्ध आहे. विहित मुदतीत परीक्षा अर्ज भरून परीक्षा देण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.