पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुरक्षा धोरणावर संशोधन व्हावे – मधुकर शिंदे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे आदर्श राज्य कारभार करत सबंध भारत देशात हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार केला. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत त्यांनी समाजोपयोगी महान कार्य केले. युद्धनीतीबरोबरच त्यांचे सुरक्षा धोरणही आदर्शवत होते. त्यांच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षा धोरणावर विद्यापीठात संशोधन व्हावे, अशी अपेक्षा माजी आयपीएस अधिकारी मधुकर शिंदे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाचव्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आयपीएस अधिकारी मधुकर शिंदे हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, अतिथी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ बघेल, ज्येष्ठ विचारवंत मुरारजी पाचपोळ, माजी महापौर अरुणा वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर यांनी केले. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चांगले काम करीत असल्याचे सांगितले. यापुढेही अहिल्यादेवींच्या नावाला शोभेल, असे काम विद्यापीठाकडून होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मधुकर शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची युद्ध व न्यायनीती श्रेष्ठ असून त्यांनी नेहमी राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यादृष्टीने काम केले आहे. त्यामुळे राज्यावर कधीही अतिक्रमण झालेले नाही. 28 वर्षे आदर्श राज्यकारभार त्यांनी पाहिला आहे. त्या केवळ धर्मकर्त्या नव्हत्या तर आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या कार्यावर अधिकाधिक संशोधन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement

जगन्नाथ बघेल म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या युद्धात पारंगत होत्या. न्यायदानासाठी देखील त्या प्रसिद्ध होत्या. प्रजावत्सल, आदर्श शासिका होत्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी व विद्यापीठाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुरारजी पाचपोळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासनावर पकड होती, असे सांगून समाजसुधारणाचे महान कार्य त्यांच्या हातून घडल्याचे सांगितले. कडक शिस्तीच्या अहिल्यादेवींनी सर्वांसाठी कार्य केले. महिलांचा आदर सन्मान त्यांनी केला. सातबारा उताराची दस्तही त्यांच्यापासून सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाल्या की, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याकडून अहिल्यादेवी होळकर यांना राज्यकारभाराचे धडे मिळण्याबरोबरच धैर्य मिळाले. आदर्श राज्यकारभार पाहत त्यांनी प्रेरणादायी कार्य केले. महिला सबलीकरण असो अथवा जलव्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, वस्त्रोद्योग निर्मिती, लघुउद्योग या संकल्पनांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्य विकसित केले. त्यांच्या आदर्श विचारांना स्मरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जागतिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, स्मारक समितीचे सदस्य, संघर्ष समितीचे सदस्य, नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व डॉ. अंबादास भासके यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.

फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाचव्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, माजी आयपीएस अधिकारी मधुकर शिंदे, कुलसचिव योगिनी घारे, ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ बघेल, ज्येष्ठ विचारवंत मुरारजी पाचपोळ, माजी महापौर अरुणा वाकसे, डॉ. प्रभाकर कोळेकर व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page