पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शकच – गोविंद काळे
सोलापूर : जगातील विविध देशातील महिला राज्यकर्त्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या लोककल्याणाच्या कार्यामुळे आजही त्यांचा राज्यकारभार मार्गदशकच आहे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक गोविंद काळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचा पाचवा नामविस्तार दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षेपूर्ती निमित्ताने एक दिवशीय शिवचरित्र अभ्यास शिबीर पार पडले. यावेळी गोविंद काळे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालिका डॉ. नलिनी टेंभेकर, इतिहास संशोधक केदार फाळके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी प्रशासन’ या विषयावर मांडणी करताना काळे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ मंदिरे, विहिरी, बारवा, राजवाडेच बांधले नाहीत, तर आजही राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असा लोककल्याणकारी राज्यकारभार त्यांनी केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी हुंडा बंदी, दारु बंदी, भ्रष्टाचार बंदी असे निर्णय घेतले आणि त्याची कडक अंमलबजावणी राज्यात केली. अहिल्यादेवी होळकर यांनी लढाई करण्यासाठी सुसज्य असे सैनिक तयार केले. त्यांच्या कारभाराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे विना विलंब आणि निपक्षपाती न्यायदान व्यावस्था उभी केली. त्यामुळे आजही न्यायदानाच्या प्रक्रियेत अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. असेही गोविंद काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.
शिबीराच्या उद्दघाटन सत्रात डॉ. नलिनी टेंभेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या आत्मविश्वासाने, जिद्दीच्या बळावर स्वराज्य उभे केल्याचे स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी लोककल्याणकारी प्रशासन उभारून जनतेच्या हितासाठी राज्यकारभार चालविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आदर्श राज्यकारभार त्यांनी केला. समाज सुधारण्याचे महान कार्य त्यांनी केल्याचेही डॉ. टेंभेकर यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी इतिहास संशोधक केदार फाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था आणि शेतकर्यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याने मोठ्या शत्रुशी युध्द जिंकुन स्वराज्या निर्माण केल्याचे स्पष्ट केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या 350 वर्षेपुर्ती निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सुधीर थोरात यांनी शिवराज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. माया पाटील या अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले. तर आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले. कार्यक्रमाला सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पाचवा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सहसंचालिका डॉ. नलिनी टेंभेकर, जेष्ठ साहित्यिक गोविंद काळे, इतिहास संशोधक केदार फाळके, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. राजेंद्र वडजे आदी.