सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना शुक्रवारपासून होणार प्रारंभ
60 केंद्रांवर परीक्षा : पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी 35 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना शुक्रवार, दि 5 एप्रिल 2024 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी दिली. सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार असून यामध्ये शहर व जिल्ह्यातील 60 केंद्रांवर सुमारे 35 हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कुलगुरू प्रा प्रकाश महानवर, सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ श्रीकांत अंधारे, पारंपरिक अभ्यासक्रम परीक्षा,
कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडून परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि 5 एप्रिल 2024 पासून बीए, बी कॉम, बीएससी, बीसीए आणि बीबीए या अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांच्या परीक्षांना सुरुवात होईल. शहर व जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पहिल्यांदा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होईल. त्यानंतर फार्मसी, विधी, इंजिनियरिंग या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना दि. 10 मे 2024 पासून सुरुवात होणार आहे. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. मेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होतील. वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याची व्यवस्था विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी या परीक्षांना अभ्यास करूनच सामोरे जावे असे आवाहन कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी केले आहे. परीक्षा देताना कॉफी सारख्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांना भरारी पथके भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करतील. कॉफी सारखे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अभ्यास करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.