“स्वारातीम” विद्यापीठाच्या युवक महोत्सवातील विडंबनातून सामाजिक राजकीय प्रश्नाला फोडली वाचा
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या जयवंत दळवी नाट्य मंचावर विडंबन या कला प्रकारातून स्पर्धकांनी देश आणि राज्य पातळीवरील सामाजिक आणि राजकीय ज्वलंत विषयांना वाचा फोडली.
राजश्री शाहू महाराज लातूरच्या वैभव काकडे, ऋतुराज सुरवसे, प्रशांत पाटील यांनी भाजीपाला नावाचे विडंबन सादर केले. या विडंबनातून देशातील बेरोजगारी मोठमोठ्या परीक्षेत होत असलेले घोटाळे, राजकारण्यांची भूमिका यामुळे समाजाचे झालेले नुकसान आधी ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. देशातील भयान वास्तविकता, विडंबनाच्या माध्यमातून युवकांनी समोर आणली.
शिवाजी कॉलेज परभणी येथील स्पर्धकांनी ‘व्यथा’ नावाचे विडंबन सादर केले. यामध्ये शाळेमध्ये प्रतिज्ञा, प्रास्ताविक, राष्ट्रगीत घेतली जाते पण वास्तवात याचा विरोधाभास कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विडंबनात अंध विद्यार्थ्यांनी सादर केलेले परिपाठ हे विडंबन प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे होते. अंधांना दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असतो हे त्यांनी दाखवून दिले. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात शाळकरी मुलीवर झालेला अत्याचार किती भयान होता हे त्यांनी विडंबनातून दाखवून दिले. सरकारच्या योजना सर्वसामान्यांना कसे अडचणीत आणतात हेही त्यांनी दाखवून दिले. या विडंबनात हरीओम, घोलप, विकास दळवे, किशन जाधव, साक्षी कदम, अनुष्का हिवाळे, ऋतुजा जोशी आदी कलावंतांनी सहभाग घेतला होता.
‘व्यथा’ नावाच्या विलंबनातून कलावंतांनी मोबाईलचा अतिवापर, बिघडलेले राजकारण, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी आज महिलावर सातत्याने अत्याचार होतात. राजकारणी सरड्यासारखे रंग बदलून कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करतात हेही यातून दाखवून दिले. शेतकऱ्यांचे आजही प्रश्न कायम असल्याचे सांगितले. या कला प्रकारात आर्यन गिरवकर, अजित गुजर, भक्ती चवडगे यांनी भूमिका पार पाडली. एकंदरीत युवक महोत्सवातील विडंबन कला प्रकारातून कलावंतांनी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे विडंबन सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले.