मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्रात ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात जग बदलण्याचे तत्वज्ञान
मुंबई, दि. २२ जुलैः साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची साहित्यसंपदा ही अनुभवातून निर्माण झाली असून त्यांची अजरामर साहित्य संपदा ही अनेकांना प्रेरणा देणारी असून त्यांच्या साहित्यात जग बदलण्याचे तत्वज्ञान दिसून येत असल्याचे प्रतिपादन डॉ. नरेंद्र पाठक, सदस्य साहित्य अकादमी दिल्ली व कार्याध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र यांनी केले. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे सत्यावर आधारीत असल्याने सत्याची मूल्ये जोपासणारे तत्वज्ञानही त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे आयोजित स्मृतिगंध कार्यक्रमात ‘अजरामर साहित्य निर्माते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक तत्वज्ञान’ या विषयावर व्याख्याते म्हणून ते बोलत होते. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, केंद्रांचे प्रभारी संचालक, प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांच्यासह प्रा. संजय देशपांडे, डॉ. शिवाजी सरगर, प्रा. संतोष राठोड यासंह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. मीनाक्षी कुरील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. रवींद्र बेंबरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांच्या कथा- कादंबऱ्यातील पात्र हे हतबल नाहीत. त्यांनी उभी केलेली पात्रे ही शौर्य, धैर्य, राष्ट्रप्रेम, त्याग आणि नितीमत्ता जोपासणारी होती. त्यांची जगप्रसिद्ध अजरामर फकिरा ही कादंबरी अनेक अर्थाने महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अण्णा भाऊंच्या साहित्यातून जगण्या-जगविण्याचे तत्वज्ञानही प्रकर्षाने दिसून येते. समाजातील अनेक बुरसटलेल्या अनिष्ट रुढी, प्रथा आणि परंपरांवर त्यांनी प्रहार करून समाजप्रबोधन केले असल्याचे त्यांनी सांगितले. फकिरा, वारणेचा वाघ, रत्ना, वैजयंती, मास्तर, मरिआईचा गाढा, चिखलातील कमळ अशा अनेक कथा कादंबऱ्यातून त्यांनी विविध विषय हाताळले. जातीभेदाच्या भिंती तोडून सामाजिक समृद्धीचे मूल्ये अण्णा भाऊंच्या साहित्यात रुजलेली पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अण्णा भाऊ साठे यांच्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि तथागत गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव दिसून येत असून या प्रभावातून त्यांनी समाजपरिवर्तनाची लढाई लढल्याचेही डॉ. नरेंद्र पाठक यांनी सांगितले. मानव केंद्रित विचार केंद्रस्थानी ठेऊन साहित्य संपदा निर्माण करण्यात अण्णा भाऊ साठे यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राची पार्श्वभूमी विशद करून या केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदविका, पदव्युत्तर आणि संशोधनाचे अभ्यासक्रम लवकरच सुरू केले जाणार असल्याचे सांगितले. बहुआयामी आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या अजरामर साहित्य संपदेवर सखोल संशोधन या केंद्राच्या माध्यमातून केले जावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी या केंद्रामार्फत मागील वर्षांपासून राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली, तसेच या केंद्राच्या माध्यमातून अण्णा भाऊंच्या साहित्यावर सखोल संशोधन करण्याचे प्रयोजन आणि भविष्यकालिन योजना व अध्यासनाच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांच्या २१ कादंबऱ्यांचे इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये भाषांतराचा प्रकल्प सुरू असल्याची माहिती दिली.
आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल प्रा. संजय देशपांडे यांनी आभार मानले. प्रा. संतोष राठोड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा. ऋतुजा राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.