संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्मार्ट हॅकथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
‘स्मार्ट हॅकथॉन’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधन व उद्योजकतेची जाणीव – कुलगुरू
अमरावती : विद्यापीठाच्या रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन द्वारे आयोजित ‘स्मार्ट हॅकथॉन’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व उद्योजकतेबद्दल जाणीव व जागृती निर्माण झाली असून समाजाच्या गरजा ओळखून समाजाला आवश्यक असलेल्या संशोधनाकरीता तसेच त्याचे प्रोजेक्टमध्ये रुपांतर होण्याकरीता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संशोधनातून मांडलेल्या नवनवीन कल्पना निश्चितच उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठात ‘स्मार्ट हॅकथॉन’ स्पर्धा संपन्न झाली, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र कडू, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, माजी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर व इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ स्वाती शेरेकर उपस्थित होते.





विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट हॅकथॉन’ स्पर्धेमध्ये सादर केलेले संशोधनरुपी नवकल्पनांचे सादरीकरण आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केला. विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि त्यातून सुरु होणारे स्टार्टअप, याविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेवून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे कौतुक केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू पुढे म्हणाले, स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. आज नोकरीच्या मागे न लागता संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता हा नवीन ट्रेन्ड विद्याथ्र्यांमध्ये निर्माण होत आहे, हे निश्चितच रोजगार मिळण्यामध्ये व रोजगार देण्यामध्ये महत्वपूर्ण पाऊल आहे. हे पाहता, भविष्यकाळ सुवर्णमय आहे.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत निरीक्षण व नोंदी घेतल्या पाहिजे, त्याचा निश्चितच संशोधनामध्ये फायदा होतो. वेगळ्या कल्पना त्यांनी अंमलात आणल्या, तर त्याचा व्यवसायामध्ये यशस्वीदृष्ट¬ा फायदा होवू शकतो, म्हणून विद्यार्थ्यांनी निरीक्षण करुन नोंदी घेण्याची प्रक्रिया सतत सुरु ठेवली पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाची इकॉनॉमी पाच ट्रिलीयन करायची आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका व सहभाग महत्वाची आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमचे विद्यार्थी निश्चितच पुढे येतील आणि भारताचा भविष्यकाळ सुवर्णमय करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलसचिव डॉ अविनाश असनारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मनातील संकल्पना कृतीमध्ये उतरवल्या आहेत. त्यांचे संशोधन समाजपयोगी तसेच देशाच्या उपयोगासाठी निश्चितच असणार आहे. नवसंशोधक मनातील संकल्पनांना नवीन भरारी देतील आणि त्या माध्यमातून आपल्या देशाकरीता काम करणारी दर्जेदार पिढी घडेल. नवउत्पादन अंतीम उत्पादनात विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून पूर्णत्वास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजेत्या विद्यार्थ्यांचा कुलगुरूंचे हस्ते सत्कार
स्मार्ट हॅकथॉन स्पर्धेत प्रथम पुरस्कार ‘बोन लिंक’ या संशोधनाकरीता वेदांत भेंडकर याला, द्वितीय पुरस्कार ‘अॅग्रीटेक आणि अन्न, गाईचे शेण’ यावरील संशोधनाकरीता डॉ गजानन भारसाकळे, तर तृतीय पुरस्कार ‘ड्रोन अॅविक्स’ या संशोधनाकरीता अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना प्रदान करण्यात आला.
याशिवाय कंसोलेशन अंतर्गत ‘योगर्वेदाय’ करीता दिपा वैद्य, डॉ नितीन वानखडे व संदीप मंडले, ‘क्लिन सोल’ करीता चिंतन झाडे, गीत दबणे व अनंता तराळे, ‘टीम औरा’ करीता पार्थ डुमरे, ‘वॉटर फिल्टर’ करीता प्रणाली तायडे, सानिका मोंढे, साक्षी चोपकर व स्नेहल शिवणकर, ‘वैदिक उपचाराकरीता’ विशाल राठोड व सर्वेश काकपूर, ‘कर्कतारक’ करीता जान्हवी देशमुख व ऋषिकेश काले, ‘टी वॉश’ करीता प्रिन्स गुप्ता व ऋषिकेश कल्याणकर, ‘टॉक प्रो’ करीता सरीन चव्हाण, सीमा खरवाडे, नकुल मनोजा व निकिता शहाणे यांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ स्वाती शेरेकर यांनी केले. कॉल फॉर सीड फंड बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव यांनी सादरीकरण केले व त्याचे उद्घाटन कुलगुरू यांनी क्लीक दाबून केले. संचालन व्यवस्थापक अमोल हिरुळकर यांनी केले. पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दहा वर्गवारीत स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये 500 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या 130 चमूंची पाचही जिल्ह्रांमधून नोंदणी करण्यात आली.