कौशल्य विकासावर आधारलेली शिक्षण पद्धती हितकारक – हनुमंतराव गायकवाड
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’
नाशिक : आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, त्यात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कौशल्यविकासावर आधारलेली शिक्षण पद्धती स्वीकारताना अंगभूत गुण आणि काम करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीची जोड दिल्यास देशात खूप मोठे काम उभे राहू शकते, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संचालक हनुमंतराव गायकवाड यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांचे ‘सामाजिक सहभाग आणि फिल्ड प्रोजेक्ट’ या विषयी काल व्याख्यान झाले. या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की जर्मनीच्या दोन पिढ्या युद्धात नष्ट होऊनही हा देश आज जगातला प्रगत देश समजला जातो. यांचे कारण कौशल्यविकासावर आधारलेली शिक्षण पद्धती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कायमच कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यात पुढाकार घेतला आहे. आपल्या अंगी जे कौशल्य असेल, जी आवड असेल, त्यात शिक्षण घेऊन पारंगत होणं ही आज जगाची गरज आहे. सेवाक्षेत्रात जगभरात रोजगाराच्या, व्यवसायाच्या भरपूर संधी आहेत. आपल्याकडे मनुष्यबळ असणे ही जमेची बाजू आहे. मात्र कौशल्याची जोड दिल्याशिवाय मनुष्यबळ व्यर्थ आहे. आपला देश आज जगातला सर्वात तरूण लोकसंख्येचा देश आहे. युवा शक्तीला कौशल्यविकासाच्या शिक्षणाच्या बाबतीत दिशा दिली तर जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न दूर नाही, असेही गायकवाड म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उद्योगक्षेत्राला पूरक – दाबक
तसेच सूकाणू समितीचे सदस्य महेश दाबक यांचेही ‘उद्योगक्षेत्रातील इन्टर्नशीप व अप्रेन्टीशीपच्या संधी’ याविषयावर काल व्याख्यान झाले. ते म्हणाले, उद्योगक्षेत्राला पूरक असा कौशल्य विकासाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्यापक विचार केलेला आहे. मुळात कोणतीही उद्योग कंपनी दोन तासांसाठी नाही, ८ तासांसाठी संधी देण्याच्या बाजूने असते. विद्यार्थ्याला काय काय प्रशिक्षण आपण देवू शकतो, याचा आपण विचार करायला हवा. छोट्या उद्योग क्षेत्रात काम मिळण्यासाठी कौशल्य हवे असते. यासाठी मुक्त विद्यापीठाला आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मंच तयार करता येईल. मुळातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांचे संवेदनशीलकरण होणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आपण असा विचार करून यातील आपली भूमिका आपण ठरवून घेतली पाहिजे. मग आपण शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक वगैरे कुणीही असो. शैक्षणिक धोरण प्रभावीपणे पोहोचवणे आणि प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. इन्टर्नशीप ही केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर सरकारी कार्यालयांमध्येही होऊ शकते, याचाही विचार करता येईल, असेही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. संजीवनी महाले, रश्मी रानडे उपस्थित होते.
कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांचे आज ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’विषयी व्याख्यान
मुक्त विद्यापीठातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहा’ निमित्त आयोजित व्याख्यानमालेत उद्या दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स’ या विषयावर परीक्षा नियंत्रक तथा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. हेही व्याख्यान विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह सर्वांसाठी महत्वाचे असून ycmou.ac.in या संकेतस्थळावर तसेच यु ट्युबवर पाहता येणार आहे.
——————————————————————————————————-