डी वाय पाटील फार्मसीच्या सिमरन पाटवेगार आणि अपेक्षा चित्रे यांना दोन वेगवेगळ्या स्पर्धामध्ये यश
कोल्हापूर : डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सिमरन जमीर पाटवेगार आणि अपेक्षा चित्रे यांनी दोन वेगवेगळ्या स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संमेलन “पायोनिअर 2025” मध्ये सिमरनने ‘सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावला असून अपेक्षाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.


कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर येथे आयोजित “पायोनिअर २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील १५० हून संशोधक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. सिमरन जमीर पाटवेगार हीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग फॉर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी ऑफ अस्पिरिन’ हा प्रकल्प सादर केला. या अभिनव प्रकल्पाच्या सादरीकरणातून सिमरनने परीक्षकांची मने जिंकली आणि ‘सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार’ प्राप्त केला.
दरम्यान, महाविद्यालयाच्या प्रतिभावान आणि प्रभावी वक्तृत्व असलेल्या अपेक्षा चित्रे हिने १७ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा आणि सातारा कॉलेज ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटना यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “सोशल मीडिया आणि आजची युवा पिढी” या विषयावर प्रभावी भाषण सादर करून, अपेक्षा चित्रे हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण शैलीने, सखोल विचारांने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली.
या यशाबद्दल सिमरन आणि अपेक्षा यांचे कुलपती डॉ संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले, प्राचार्य डॉ चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.