नागपूर विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रुती तिरपुडे हिला हंगेरी विद्यापीठाच्या पीएच डी साठी फेलोशिप प्राप्त

विद्यापीठ मॉलिक्युलर बायोलॉजी व जेनेटिक इंजिनिअरिंग विभागाचा बहुमान 

परिचय कार्यक्रमात श्रुती तीरपुडेचा सत्कार 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मॉलिक्युलर बायोलॉजी व जेनेटिक इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी श्रुती तिरपुडे हिला हंगेरी येथील विद्यापीठाची पीएचडीसाठी फेलोशिप प्राप्त झाली आहे. हंगेरी विद्यापीठाकडून श्रुतीला प्रतिमाह १ लाख ६० हजार रुपये फेलोशिप प्राप्त होणार आहे. विभागातील विद्यार्थिनीच्या या यशामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान प्राप्त झाला आहे. विभागात आयोजित परिचय कार्यक्रमात श्रुती तिरपुडे हिचा सत्कार करण्यात आला.

मॉलिक्युलर बायोलॉजी व जेनेटिक इंजिनिअरिंग विभागात आयोजित परिचय व सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अलाहाबाद येथील प्रयागराज विद्यापीठाचे माजी संचालक डॉ प्रमोद रामटेके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ अलका चतुर्वेदी, दिल्ली येथील जामिया विद्यापीठातील डॉ मोहम्मद रिजवान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची अध्यक्षता विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले यांनी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ प्रमोद रामटेके यांनी आधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विदेशातील नामांकित विद्यापीठातून ज्ञान प्राप्त करून घेण्याची धडपड केली पाहिजे, असे सांगितले. श्रुती तिरपुडे यांना हंगेरी येथील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केल्याचे सांगत अन्य विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉ अलका चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन करताना सर्वांसोबत विनम्रतेने व आदराने वागले पाहिजे असे सांगितले. डॉ मोहम्मद रिजवन यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन स्पष्ट असायला हवा. विद्यार्थ्यांनी पूर्ण शैक्षणिक वर्षात केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सोबतच पूर्णवेळ उपस्थित राहिले पाहिजे, अशा तीन अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

Advertisement

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले यांनी मार्गदर्शन करताना विभागातील अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा आणि तज्ञ शिक्षक याबाबत माहिती दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन मोठे पद प्राप्त करीत विद्यापीठ व विभागाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये दोन विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा, दोन विद्यार्थ्यांनी महाज्योती फेलोशिप, नेट आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षा व दोन विद्यार्थ्यांनी पीएचडी फेलोशिप प्राप्त केली. यात श्रुती तिरपुडे या विद्यार्थिनीला हंगेरी येथील नामांकित अशा विद्यापीठांमध्ये बुरशीवर संशोधन पीएचडी करण्याकरिता १ लाख ६० हजार रुपये प्रतिमाह फेलोशिप देऊ केली आहे. त्याचप्रमाणे राहण्याची जेवणाची व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रुची वासनिक यांनी केले. संचालन प्रा रेणुका व्यवहारे यांनी केले तर आभार प्रा माधुरी ठाकरे यांनी मानले.

अधिकाधिक प्लेसमेंटबाबत चर्चा

कार्यक्रमानंतर लगेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार (प्लेसमेंट) कसे मिळवता येईल, याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीची अध्यक्षता विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले यांनी केली. बैठकीला विभागातील डॉ माधुरी ठाकरे, डॉ स्वाती गोडघाटे, डॉ शीतल चौधरी, प्रा रेणुका व्यवहारे, प्रा अमोल पिंपलशेंडे, प्रा क्षितिज सहारे आणि प्रमुख अतिथी डॉ प्रमोद रामटेके, डॉ अलका चतुर्वेदी, डॉ मोहम्मद रिजवान यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page