गोंडवाना विद्यापीठात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन जयंती मोठया उत्साहात साजरी
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे मराठी साहित्यात मोलाचे योगदान – प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे
गडचिरोली : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मराठी साहित्यात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ येथे मराठी विभागांतर्गत आयोजित श्रीचक्रधर स्वामी जयंती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दि ५ ऑगस्ट रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती घेण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने, गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ सविता गोविंदवार, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचे डॉ निळकंठ नरवाडे, डॉ हेमराज निखाडे, प्रा अमोल चव्हाण व इतर विभागांचे प्राध्यापक आणि मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करतांना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ कावळे म्हणाले, “श्रीचक्रधर स्वामींना सर्वज्ञ असे संबोधले जात असून ते महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक आहेत. मराठी साहित्यात त्यांचे व त्यांच्या अनुयायांचे मोलाचे योगदान आहे. श्रीगोविंदप्रभू चरित्र लिहून त्यांनी चरित्रलेखनाला आरंभ केला होता. विद्यार्थी व प्राध्यापकांनी देखील त्यांचे जीवनकार्य आणि साहित्य अभ्यासले पाहिजे. तत्कालीन परिस्थितीत सामाजिक क्रांती करण्याचे साहस करणारे ते पहिले महापुरुष होते. त्यासोबतच प्र-कुलगुरु डॉ कावळे
यांना महानुभाव पंथ व श्रीचक्रधर स्वामींच्या जीवनकार्याच्या सखोल अभ्यासातून श्रीचक्रधर स्वामींच्या जन्मापासून ते कार्याविषयी, त्यांचे गुरु श्रीगोविंदप्रभू यांचेविषयी विस्तृत माहिती दिली.
पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाने प्रथमच श्रीचक्रधर स्वामी जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. दरवर्षी श्रीचक्रधर स्वामी जयंतीच्या निमित्याने मराठी विभागाच्या वतीने श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची वर्तमान स्थितीत असणारी आवश्यकता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे उपक्रम घेण्याचे निश्चित केले.