‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१९ फेब्रुवारी रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासन निर्णयानुसार कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे स्पुर्तीदायक ‘राज्यगीत’ गायन करून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर राज्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या लहान पुतळ्याची पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी स्वतः पालखीला खांदा देवून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये ढोल पथक, लेझीम पथक इत्यादींनी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव मेघश्याम सोळंके, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, सिनेट सदस्य शिवाजी चांदणे, शिवराम लुटे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.