शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये पश्चिम विभागीय गटात प्रथम क्रमांक

युवा संसद स्पर्धेतील विजेत्यांनी देशविकासात योगदान द्यावे – कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर : युवा संसद स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर विजेत्या विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी येथे केले. सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये पश्चिम विभागीय गटात प्रथम क्रमांक मिळविण्याची कामगिरी करणाऱ्या संघातील विद्यार्थ्यांनी आज कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.

सोळाव्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ नवी दिल्ली येथे भारतीय संसदेच्या बालयोगी सभागृहात १६ फेब्रुवारी रोजी पार पडला. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अनेक विद्यापीठांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरी बजावत दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. आपल्या विभागात अव्वल कामगिरी केल्यामुळे या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ संघ, समन्वयक आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमानंतर विद्यापीठात परतल्यानंतर आज या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, युवा संसद स्पर्धा ही विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास, लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते. या मूल्यजाणीवा विद्यार्थ्यांनी पुढे आयुष्यभर सोबत बाळगून आपली वाटचाल यशस्वी करणे आवश्यक असते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची आणि त्याद्वारे सामाजिक सेवेमध्ये योगदान देण्याची प्रेरणा मिळाली, तरी स्पर्धेचा हेतू साध्य होऊन जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील काळात विद्यापीठ संघाला मार्गदर्शन करावे, जेणे करून विद्यापीठाची या स्पर्धेतील कामगिरी सातत्याने उंचावत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्पर्धेचे विद्यापीठ समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी विद्यापीठ संघाच्या एकूण कामगिरीविषयी उपस्थितांना अवगत केले. विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेमधील आपले अनुभव सांगितले. यावेळी पवन पाटील, प्रतीक्षा कांबळे, प्रतीक्षा पाटील, ऋतिका धनगर, आसिया जमादार, श्रेया म्हापसेकर, साईसिमरन घाशी आणि अनमोल पाटील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेद्वारे मिळालेला आत्मविश्वास, भारतीय संसदेमध्ये वावरताना मनात जागृत झालेली देशप्रेमाची उदात्त भावना यांविषयी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page