शिवाजी विद्यापीठाचा पहिला ‘पद्मश्री डॉ डी वाय पाटील पुरस्कार’ मारुतीराव जाधव यांना जाहीर
कोल्हापूर : संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ डी वाय पाटील पुरस्कार’ सुरू केला आहे. सन २०२४ साठीचा पहिला पुरस्कार तळाशी (ता राधानगरी) येथील मारुतीराव जाधव (तशाळीकर गुरुजी) यांना आज जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये एक लक्ष, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. ही माहिती कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी दिली.
पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा संत साहित्यामध्ये जीवनभर ध्यासपूर्वक काम करणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासकाला देण्यात येणार आहे.
मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास करीत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली असून त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे ते संयोजन करीत आहेत. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे काम ते अखंडितपणे करीत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या पुरस्कार निवड समितीमध्ये कुलगुरू यांनी नियुक्त केलेले सदस्य डॉ रमेश वरखेडे (नाशिक), डॉ एकनाथ पगार (देवळा), प्रा प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांनी काम केले. सदस्य सचिव म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक आणि मराठी विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले. सदर पुरस्कार प्रदान समारंभ लवकरच सन्मानपूर्वक करण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ शिर्के यांनी दिली.