शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ उत्तम सकट यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ उत्तम सकट यांना सन २०२२-२३साठी महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
डॉ. सकट हे १९९७ पासून शिवाजी विद्यापीठात कार्यरत आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रामध्ये बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. सकट यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. सकट हे मागासवर्गीय, उपेक्षित, वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी सातत्याने कार्यरत आहेत. मातंग समाजामध्ये सामाजिक व शैक्षणिक जागृतीसाठीही ते काम करीत आहेत. त्यांनी ‘अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि मातंग समाज’ या विषयावरील पीएच.डी. शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला. याचे पुस्तकरुपात प्रकाशनही केले. मातंग समाजाच्या आर्थिक विकासामधील महामंडळाच्या योगदानाचा त्यांनी साकल्याने केलेला अभ्यास महत्त्वाचा ठरला.
या पुरस्कारामुळे शिवाजी विद्यापीठ परिवाराला अतीव आनंद झाला असून संपूर्ण विद्यापीठासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. सकट यांचे अभिनंदन केले आहे.