शिवाजी विद्यापीठात निवृत्त शिक्षकांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन शिष्यवृत्त्या प्रदान
कौशल्य-आधारित शिक्षणावर भर देण्याची गरज – कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के
पुरातन काळापासून चालत आलेली गुरू-शिष्य परंपरा ग्रामीण भागात दृढ – प्रा डॉ आर जी सोनकवडे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात आयोजित शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात कौशल्य-आधारित शिक्षणासाठी कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के यांनी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रम शिकवण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. त्यांनी यावेळी विद्यार्थी भवन मधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के यांनी विभागातील निवृत्त प्राध्यापक एम बी डोंगरे यांनी विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी साडे सहा लाख रुपयांची देणगी दिल्याचे सांगून या विभागाला दातृत्वाचा वारसा असल्याचे नमूद केले.
भौतिकशास्त्र अधिविभागात पार पडलेल्या या कार्यक्रमात निवृत्त शिक्षकांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या. प्रा डॉ बी व्ही खासबारदार यांनी पुरस्कृत केलेली निवृत्ती शिक्षकाची शिष्यवृत्ती आणि प्रा डॉ सी एच भोसले यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कृत केलेली शिष्यवृत्ती सुबहान जमादार, प्रियांका पाटील आणि संपदा चव्हाण या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, मागील वर्षी ही शिष्यवृत्ती प्राप्त करणारी संपदा चव्हाण यांनी ही रक्कम स्वयंविकासासाठी आणि सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वापरली, असे सांगून त्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
माजी विभागप्रमुख प्रा डॉ के वाय राजपुरे यांनी आपल्या मनोगतात विभागातील दोन अनुभवी शिक्षक, प्रा डॉ खासबारदार आणि प्रा डॉ भोसले यांच्याबद्दलच्या आपल्या आदरभावना व्यक्त केल्या. त्यांनी या दोन्ही शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करून त्यांच्या विभागातील योगदानाला तसेच
त्यांच्याबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी नमूद केले की, या दोन्ही शिष्यवृत्ती विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ या योजने अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना विभागप्रमुख प्रा डॉ आर जी सोनकवडे यांनी गुरू-शिष्य परंपरेचे शाश्वत महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी विभागातील डॉ ए व्ही मोहोळकर, डॉ आर एस व्हटकर, डी एच भादले, डॉ एम व्ही टाकळे, डॉ एस पी दास, डॉ व्ही एस कुंभार, डॉ एस एस पाटील, डॉ एम आर वायकर, डॉ ए आर पाटील, उमेश भोसले, अभिजीत लिंग्रस, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपकुलसचिव बी एम नाळे यांनी स्वागत व प्रास्तावित केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ एन एल तरवाळ यांनी मानले. सूत्रसंचालन नेहा शहा व साक्षी काळे यांनी केले.