अमरावती विद्यापीठाची उन्हाळी-2024 पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाची परीक्षा 5 जुलै रोजी होणार
वेळापत्रकातील बदलाची विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी-2024 ची नवीन सी बी सी एस पध्दतीमध्ये प्रवेशित (नियमित) अभ्यासक्रमाची परीक्षा यापूर्वी 28 मे, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, तथापि शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये सत्र -1 व 2 तसेच शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये सत्र -3 व 4 ला सर्व विद्याशाखांमधील बहुतांश अभ्यासक्रमांना सी बी सी एस पध्दती लागू करण्यात आलेली आहे.
त्यामधील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा योजनेत लेखी परीक्षेच्या गुणांबाबत तफावत आढळून आलेली होती, त्यामुळे नवीन सी बी सी एस अभ्यासक्रमाच्या (नियमित) विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेबाबत यथावकाश कळविण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये सत्र – 4 ला नवीन सी बी सी एस पध्दतीमध्ये प्रवेशित (नियमित) विद्यार्थ्यांची पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाची उन्हाळी-2024 परीक्षा ही दि 05 जुलै, 2024 रोजी सकाळी 09:00 ते 12:00 या वेळेत घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी कळविले आहे.
सदर परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यापीठामार्फत पुरविण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांनुसार घेण्यात येईल. तसेच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे, तसेच अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांना 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.