विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन एसएफआय अंबाजोगाई तालुका कमिटीची आग्रही भूमिका
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची भेट घेऊन दिले निवेदन
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील व ग्रामीण भागातील विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी अनेक शैक्षणिक अडचणींना तोंड देत आहेत. बऱ्याच वेळा या अडचणींसमोर हतबल होऊन शिक्षणात माघे पडत आहेत. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप एसएफआय करते कारण की केंद्र व राज्य सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. याचा परिणाम असा की विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून कायमचा बाहेर पडत आहे. हा विद्यार्थी बहुतांश प्रमाणात शेतकरी, कामगार, शेतमजूर, नोकरदार, मध्यमवर्ग, सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
हे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर पडण्याचा परिणाम सदरील विद्यार्थी व्यसनाधीनतेला बळी पडत आहेत, गुंड प्रवृत्तीला बळी पडत आहेत, जाती-धर्मांच्या जाळ्यामध्ये अडकून, खोट्या अभिमानाला, खोट्या अस्मितेला उराशी बाळगून, स्वतः एक भारतीय असतानाही दुसऱ्या आपल्याच भारतीय भाऊबंदांचे पक्के वैरी होत आहेत. दरवर्षी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये भरच पडत चालली आहे मग याची कारणे काय? ते कोण शोधून काढणार? कोण त्यांच्या अडचणींकडे लक्ष देणार? त्यांच्या भवितव्याचा कोण विचार करणार? आपण संसदीय लोकशाही पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करत असतो की त्यांनी आपल्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आपला जास्तीत जास्त विकास करण्यासाठी तत्परतेने काम केले पाहिजे परंतु प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.
म्हणूनच विद्यार्थी गटामध्ये विद्यार्थ्यांच्या विविधांगी अडचणी लक्षात घेऊन, त्यांवर मार्ग शोधण्यासाठी तत्परतेने काम करणारे संघटन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया देश पातळीवर काम करत आहे या संघटनेची अंबाजोगाई तालुका कमिटी विद्यार्थ्यांच्या पुढील मागण्या घेऊन लढ्यात उतरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.१९ मार्च २०२४ रोजी पुढील मागण्या घेऊन तहसीलदारांना तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
- १) अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी
- २) अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात यावी
- ३) सर्व विद्यार्थ्यांना बस पास मोफत देण्यात यावा
- ४) दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे तालुक्यातील सरसगट विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी.
सदरील मागण्या मान्य करण्यात नाही आल्या तर एसएफआय अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एसएफआय अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी एसएफआय अंबाजोगाई तालुका अध्यक्ष आदित्य कासारे, तालुका कमिटी सदस्य शोएब सय्यद, सुशील जगदाळे आदी उपस्थित होते.