राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांची पदवीपूर्वीच ॲसेंचर कंपनीत निवड
कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये पदवी मिळण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. ॲसेंचर या कंपनीत तब्बल ३.५ लाखांचे वार्षिक पॅकेज प्राप्त करीत विद्यापीठातील ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जमनालाल बजाज भवन येथे शुक्रवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित एका कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ शैक्षणिक परिसरातील नम्रता नीरज त्रिपाठी, हिस्लाॅप महाविद्यालयातील मनीषा ईश्वर महादुलकर, सेवादल महिला महाविद्यालयातील मंजिरी राहुल बावस्कर, आदिती रवींद्र गावंडे व उन्नती रामचंद्र खंते तर एसएफएस महाविद्यालयातील अभय राजू लोणकर व वंश सुजितकुमार मिश्रा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आगामी उन्हाळी २०२५ च्या परीक्षेत सर्व विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहे. यामध्ये एमएससी मधील एक तर अन्य विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रामगीता भवन येथे ॲसेंचर कंपनीच्या वतीने अर्ज प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांमधून १२६ जणांची ऑनलाइन परीक्षा १८ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. यामधून प्रत्यक्ष मुलाखतीनंतर सात विद्यार्थ्यांची निवड कंपनीच्या वतीने करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर मिहान येथे रुजू केले जाणार आहे. विशेष म्हणजे, निवड झालेले सर्वच विद्यार्थी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलेले आहेत. यावेळी पदव्युत्तर गणित विभाग प्रमुख डॉ गणेश केदार, हिस्लाॅप महाविद्यालयाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ हरिओम पुणीयानी, सेवादल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ निरुपमा ढोबळे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ प्रभाकर भंडारी व एसएफएस महाविद्यालयाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ साधनकर यांची उपस्थिती होती. शिक्षण प्राप्त होताच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून विद्यापीठाच्या वतीने रोजगार व प्रशिक्षण विभाग निर्माण करण्यात आला आहे. या विभागाच्या वतीने विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जाते. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.