शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी ५ सप्टेंबर पर्यंत मुदत
कोल्हापूर : विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांतील सामंजस्य कराराअंतर्गत पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सप्टेंबर, २०२४ मध्ये सुरु होत आहे. यासाठी प्रवेश पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी आहे. तसेच त्यास ट्रान्स्फर वा मायग्रेशन प्रमाणपत्राची गरज नाही. ही भाषा इतर अभ्यासक्रम, नोकरी करत शिकता येते. तास शुक्रवार-शनिवार सायंकाळी असतात.
महाराष्ट्रात पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम असणारी शिवाजी विद्यापीठ ही एकमेव संस्था आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ कोल्हापुरातील महाविद्यालये, तसेच विद्यापीठातील सर्व अधिविभागांत विविध विद्याशाखांत इतर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी, विशेषत: इतिहास विषयाचे विद्यार्थी-संशोधक, शिक्षक-अभ्यासक, व्यापार क्षेत्रातील लोक घेऊ शकतात.
पोर्तुगीज भाषा ही जगातील पाचवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पोर्तुगाल बरोबरच ब्राझील, अंगोला, केप वर्दे, साओ टोमे आणि प्रिंसिपे, गिनी बिसाऊ, मोझांबिक, इक्वेटोरियल गिनी आणि ईस्ट तिमोर या देशांची ती अधिकृत भाषा आहे. या देशांशी भारताचे व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत. गोवा व जागतिक स्तरावर भाषांतर, पर्यटन, हॉटेल उद्योग अशा विविध क्षेत्रांत पोर्तुगीज भाषा तज्ज्ञांना शैक्षणिक व रोजगाराच्या संधी आहेत.
माहितीसाठी त्वरित संपर्क साधा :
विभागप्रमुख डॉ मेघा पानसरे
कार्यालय: 0231-2609237
विदेशी भाषा विभाग, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.