सौ के एस के महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन
बीड : येथील सौ के एस के महाविद्यालय कर्मचारी कल्याण समिती तर्फे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकिय विचारवंत उदय निरगुडकर यांचे विकसीत भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी कळविले आहे. महाराष्ट्र नॉलेज सेंटरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमा अंतर्गत विकसीत भारत या विषयावर ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील विकसित भारत या विषयावरती निरगुडकर यांचा दांडगा अभ्यास असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र,खान्देश, मराठवाडा भागात त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून निरगुडकर यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळे धागा शौर्याचा, राखी अभिमान की, सैनिकांच्या समवेत दिवाळी, आपला सैनिक, आपली दिवाळी हे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सिमेवर जावून सैनिकांसाठी संवाद साधत त्यांनी राष्ट्रभक्ती तेवत ठेवली आहे. पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबवत विविध चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आपले परखड मत मांडलेले आहेत. अनेक वृत्त वाहिन्यांचे मुख्यसंपादक म्हणून यशस्वी त्यांची कारकिर्द राहिलेली आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक विविध कार्यक्रम करून त्यांनी कलेची जोपासना केली आहे. त्यामुळे त्यांना संगीत अकादमी तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देश विदेशातील विद्यापीठे, संशोधन संस्था, एनएचपीसी या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात स्वतंत्र संचालक डॉ उदय निरगुडकर हे आहेत. अशा ज्येष्ठ पत्रकाराचे व्याख्यान सौ के एस के महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ सतिश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,डॉ विनायक चौधरी,डॉ भीमराव राठोड यांनी केले आहे.