एमजीएम विद्यापीठात डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष चर्चासत्र संपन्न

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणे आवश्यक; एमजीएममधील चर्चासत्रातून मान्यवरांचा सूर…

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना असंख्य प्रकारचे प्रश्न पडत असतात. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधत असताना सदसद्विवेक बुद्धीचा वापर करीत वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणे आवश्यक असल्याचा, सूर चर्चासत्रात मान्यवरांनी काढला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती, एमजीएम विद्यापीठ, सामाजिक शास्त्र संस्था आणि वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात ‘ वैज्ञानिक दृष्टिकोन – निकोप जीवनशैली ‘ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी चर्चेच्या माध्यमातून संवाद साधला.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालिका डॉ झरताब अंसारी, प्रा आशा देशपांडे, प्रा आशुतोष पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ श्याम महाजन, व्यंकट भोसले, शंकर बोर्डे, लक्ष्मण जांभळीकर, माणिक दालभाडे, पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना महाजन म्हणाले, डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू केली. ही चळवळ विज्ञानवादी दृष्टिकोण बाळगत सर्वांना जे विज्ञानाने सिद्ध केले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास सांगते. निर्भय होत विवेकाने वागणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीना काही कार्यकारण भाव असतो. चमत्कार करणारे सगळे बोंदू असतात. त्यावर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव धर्माच्या विरोधात नसून यावरून होत असलेल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आहे.

विज्ञानवादी दृष्टिकोण ठेवत अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा दिवा आपल्याला लावायचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगत वैज्ञानिक मार्गावरून आपण मार्गक्रमित होण्यासाठी आजच्या या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैज्ञानिक आधारावर खऱ्या उतरणाऱ्या गोष्टी आपण प्रमाण मानून पुढे जाणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

या चर्चासत्रात विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई पवार या विद्यार्थिनीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page