सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी प्रशासनावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून नामविस्तार दिनानिमित्त सोमवार, दि. 11 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी प्रशासन आणि त्यांचे समाजकार्य’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी, सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे असणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात माजी आयपीएस अधिकारी मधुकर शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ बघेल, ज्येष्ठ विचारवंत मुरारजी पाचपोळ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर तसेच लोककल्याणकारी प्रशासनावर विचार मंथन करणार आहेत. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, स्मारक समितीचे सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.