दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात बालहृदयरोग विज्ञानातील अद्यावत प्रगतीवर चर्चासत्र संपन्न
सावंगी मेघे येथे निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रमाचे आयोजन
वर्धा – सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचा बालरोग विभाग आणि अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रमांतर्गत बालहृदयरोग विज्ञानातील अद्ययावत प्रगतीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन ज ने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय गायधने यांनी केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी बालरोग विभाग प्रमुख डॉ अमर ताकसांडे होते. मंचावर ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ जयंत वाघ, डॉ अमोल लोहकरे, डॉ वैभव अंजनकर, डॉ निनावे, आयोजन सचिव डॉ रेवत मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या चर्चासत्राची सुरुवात शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ विलास चिमूरकर यांच्या एम्ब्रॉयलॉजी ऑफ हार्ट या विषयावरील व्याख्यानाने झाली. चर्चासत्रात सावंगी रुग्णालयातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ शंतनू गोमासे व नागपूर येथील डॉ मनीष चोकरंद्रे यांनी क्रमशः एसायनोटिक व सायनोटिक या विषयाची मांडणी केली. त्यानंतर ऱ्हिदमिक डिसऑर्डर इन चिल्ड्रन या विषयावर डॉ प्रणित लाळे तर बालरोग हृदयविज्ञानातील विविध प्रक्रियांबाबत डॉ वैभव राऊत यांनी संवाद साधला.
सत्राच्या अध्यक्षस्थानी शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ संजय गाठे होते. या सत्राची सूत्रे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ अमर ताकसांडे यांनी सांभाळली. या संपूर्ण आयोजनात डॉ आशिष वर्मा, डॉ श्याम लोहिया, डॉ राजेंद्र बोरकर, डॉ सारिका गायकवाड, डॉ केता वाघ, डॉ महावीरसिंह लाक्रा यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.
या निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रमात ज्येष्ठ बालरोग चिकित्सक आणि वरिष्ठ प्राध्यापकांचा सहभाग होता. तसेच, बालरूग्णांचे प्रभावी व परिणामकारक उपचार आणि सर्वांगीण निगा राखण्याबाबतच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी ही चर्चासत्रे मार्गदर्शक ठरली. बालरुग्णांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता ही शैक्षणिक सत्रे अत्यंत माहितीपूर्ण, ज्ञानपूर्ण आणि वैद्यकीय सेवेसाठी उपयुक्त ठरणारी होती.