भारती विद्यापीठात “एक्सप्लोरिंग निश हॉस्पिटॅलिटी सेगमेंट्स” या विषयी एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
पुणे : भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे “एक्सप्लोरिंग निश हॉस्पिटॅलिटी सेगमेंट्स”हे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचा उद्देश हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील विशिष्ट पण वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगातील नव्या ट्रेंड्सबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

यावेळी आत्मतन वेलनेस रिसॉर्ट्सचे संस्थापक व डायरेक्टर निखिल कपूर, ‘दी कोवि’चे बीझिनेस हेड विक्रांत झारिया, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ अस्मिता जगताप, प्राचार्य ललिता चिरमुले उपस्थित होते. कपूर यांनी काळाची गरज ओळखून आज माणसाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ मिळण्यासाठी ‘आत्मतन’ सारख्या निसर्गाच्या कुशीत शुद्ध हवेत अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शांत वातावरणात उत्तम राहण्या व खाण्याची सोय असलेल्या रिसॉर्ट बद्दल माहिती दिली. ‘पेट फीस्ट’ च्या सोनल झलकीकर यांच्या हटके व्यवसायात पाळीव प्राण्यासाठी विविध मांसाहारी पदार्थांची मागणीनुसार उत्पादन व विक्री यांची माहिती दिली. प्राण्यासाठी केकचे विविध मांसाहारी प्रकार येथे उपलब्ध असल्याचे सांगितले.
झारिया यांनी को लिविंग संकल्पनेवर आधारित असलेल्या स्पेसेस बद्दलची वाढती मागणी आणि सुविधाबद्दल माहिती दिली. डॉ जगताप, यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असताना सतत शिकणे, नवनवीन गोष्टी भान ठेवून आत्मसात करायच्या आणि त्या बेभान होऊन राबवायच्या हा डॉ पतंगराव कदम यांचा कानमंत्र दिला. नवे दृष्टिकोन, संधी आणि करिअरच्या वाटा यांविषयी माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी अधिक जवळीकता साधता आली.
यावेळी हॉटेल व्यवस्थापन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवर तज्ञांना आमंत्रित केले होते. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रा सुनीता सांगळे यांनी चर्चासत्राचे संयोजन केले.