यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात “स्पर्धा परीक्षा : संधी आणि आव्हाने”  या विषयावर परिसंवाद संपन्न

स्वतःला नियमांमध्ये बंधिस्त करा – किशोर राजे निंबाळकर

नाशिक : स्वता: मधील न्यूनगंड बाजूला ठेवा. आधुनिकतेच्या युगात सोशल मीडियाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढा. संगत चुकली की जगण्याची दिशा बदलते. बुद्धीचा विकास हा एकांतात होतो तर चारित्र्याचा विकास हा संगतीत होतो. त्यामुळे इतरत्र वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला काही एक नियम घालून द्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. कारण मेहनतीशिवाय फळ नाही. रोज आपण काय करणार आहोत. याची दैनंदिनी तयार करा. आपण या क्षेत्रात का आलो आहोत याचे भान ठेवा. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या जगात स्वतःला नियमांमध्ये बंधिस्त करा.असे मत महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने  २५ फेब्रुवारी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड,पुणे  येथे  “स्पर्धा परीक्षा : संधी आणि आव्हाने”  या  विषयावर  एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. निंबाळकर पुढे म्हणाले, उमेदवारांनी स्‍पर्धा परीक्षेची तयारी करताना काही नियम स्‍वत:ला घालून घ्यावेत,  चौथ्या परीक्षेची खात्री वाटत असेल तर तयारी करा. त्‍यानंतर यश न मिळाल्‍यास प्‍लॅन बीचा अवलंब करावा. हा दुसरा पर्याय म्‍हणजे न्‍यूनगंड न बाळगता ती एक संधी म्हणून समजायला हवे. त्यातून ही अनेक जणांनी यश मिळविले आहे,

Advertisement

निंबाळकर पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खासगी क्‍लासेस,  मुलाखतीसाठी स्वतंत्र क्लासेस या सर्वांची आवश्यकता आहे का याचा विचार करावा.  स्‍पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या उमेदवारांना शहरी वातावरणाशी मिळवून घेण्यासाठी वेळ लागतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम व  प्रश्नपत्रिका स्वरुपावरुन अभ्यासाची तयारी आपल्या गावीही करता येणे शक्य आहे. याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. निंबाळकर पुढे म्हणाले, बुद्धिचा विकास एकांतात आणि चारित्र्याचा विकास संगतीत होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण प्रशासकीय सेवेत का जात आहोत, त्याचे उद्दिष्ठ ठेवून ध्येयाप्रती प्रयत्न करा. इंस्टाग्राम, फेसबूक आणि व्हाट्स अॅपचा वापर करणे बंद करा. त्यातून नकळतपणे किती वेळ जातो, याचे भानही राहत नाही. अनावश्यक ग्रुपमधून बाहेर पडा. हुशार मित्रांचे समूह तयार करा. त्यात आज केलेल्‍या अभ्यासाचे सविस्तर मांडणी प्रत्येकांनी समूहात मांडा. त्यावर प्रत्यक्षरीत्या चर्चा करा. त्याच पद्धतीने मुलाखतीची तयारी करा. दैनंदिनी लिहून ठेवा, याकडे निंबाळकर यांनी लक्ष वेधले. तसेच, २०२५ पासून वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या परीक्षेची मानसिकता आतापासून तयारी ठेवावी.

 कुलगुरुपदाचा प्रवास हा प्‍लॅन बीमधून झाला आहे, असे सांगून कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, नित्य नियमाने व्यायाम, वाचन व चिकीत्सक अभ्यास करणे आवश्यक आहे. स्‍वत:ला ओळखा आाणि त्यादृष्टीने आयुष्याकडे वाटचाल करा.

संयोजक राजेश पांडे म्‍हणाले, स्‍पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने भविष्यात अनेक योजना करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून मदत करण्याची भूमिका आहे. त्याच उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, संचालक डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. दयाराम पवार, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, कैलास मोरे, विद्यार्थी, आदी मान्यवर उपस्थित होते.

——————————————–

फोटो ओळी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने  “स्पर्धा परीक्षा : संधी आणि आव्हाने” या विषयावर  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते,  याप्रसंगी राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, समवेत मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, राजेश पांडे, डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. व्ही. बी. गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page