गोंडवाना विद्यापीठात ‘बांबू फॉर ग्रिन इकॉनॉमी’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रा अंतर्गत गडचिरोली जिल्यातील बांबू क्षेत्रातील विकासाकरिता एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
गडचिरोली : पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (आर.जी. एस. टी.), मुंबई, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनानुसार व अध्यक्षतेखाली विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख अशिस घराई यांनी गोंडवाना विद्यापीठ, येथे ‘बांबू फॉर ग्रिन इकॉनॉमी’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे. विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख अशिस घराई, सल्लागार, महाराष्ट्र शासन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग नागपूर, प्रगती गोखले, मुख्य सल्लागार व ट्रस्टी, बीएआयएफ गिरीश सोहनी आणि अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र सी. डी. मायी आदी उपस्थित होते .
या चर्चासत्रादरम्यान बांबू उत्पादनाच्या संधी, विविध बांबू प्रजातींचे आर्थिक व पर्यावरणीय फायदे, योग्य प्रजातींची ओळख, निवड व लागवडपद्धती, बांधकाम क्षेत्रातील बांबूचा उपयोग, बांबू काढणी पद्धती तसेच बांबू क्षेत्रातील उपजीविकेच्या संधी अश्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान बांबू क्षेत्रातील तज्ञ व अभ्यासक, वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. पी. तेताली, बांबू नर्सरी, भोर (पुणे), विनय कोलते, संचालक, नेटिव्ह कोनबॅक बांबू प्रोडक्ट्स प्रा. लि संजीव करपे, संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, अविनाश कुमार (आय एफ एस), संस्थापक, संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट, निरुपमा देशपांडे, संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी एम. इस. रेड्डी व इतर मान्यवरांचा समावेश होता. या चर्चासत्राच्या निममित्ताने, एस.टी.आर.सी. बांबूबद्दल समृद्ध दृष्टीकोन एकत्रित करण्यासाठी, विविध संसाधनाचा लाभ घेण्यासाठी, येथील समुदायाच्या फायद्यासाठी व्यवहार्य धोरण आणि सहभागींच्या तसेच उपस्थित तज्ञांच्या महत्वपूर्ण सूचना एकत्रित करून एक ‘श्वेतपत्रिका’ तयार करणार आहे.
या चर्चासत्रात महाराष्ट्रातील बांबू तज्ञांनी सहभाग घेतला होता.
बांबूचे विविध उपयोग आणि इतर वनस्पतींच्या तुलनेने वेगवान वाढ यामुळे, ज्या भागात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. तेथे सामाजिक व आर्थिक उपक्रमांना चालना देण्यासाठी बांबू हे खरोखरच एक उत्तम साधन आहे. गडचिरोली जिल्हा हा बांबू संसाधानाने समृद्ध असून विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र ही संस्था मागील पाच वर्षापासून बांबू क्षेत्रात कौशल्य विकासासाठी कार्य करीत आहे. बांबू समृद्ध असलेल्या गडचिरोली सारख्या प्रदेशात बांबू संसाधनांचा उपयोग स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी केला पाहिजे.