एमजीएममध्ये एआय वर व्याख्यान संपन्न
आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा वापर करताना नैतिकता जपणे आवश्यक – डॉ.के.सी.संतोष
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
छत्रपती संभाजीनगर : आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत असून याचा वापर करीत असताना सर्वांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे. विशेषत: सर्वच क्षेत्रात याचा वापर सकारात्मकपणे कसा होऊ शकतो या बाबीचा विचार आपण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ डकोटा विद्यापीठाच्या संगणक विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.के.सी.संतोष यांनी येथे केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आज सकाळी १०:३० वाजता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट फॉर कॉम्पुटर सायन्स’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये श्री. संतोष यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, संचालिका डॉ. गीता लाटकर, अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
संतोष म्हणाले, समकालीन काळ हा तंत्रज्ञानाचा काळ असून आर्टिफिशियल इंटेलिजियन्स हे केवळ संगणक क्षेत्राशी मर्यादित नसून सर्वच क्षेत्रांसाठी खुले असणारे हे तंत्रज्ञान आहे. इतर विद्याशाखेतील विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा वापर करून मानवी जीवन सुसह्य बनवू शकतात. तरुणांसाठी एआय क्षेत्रात रिसर्च फिल्डमध्ये फार संधी असून या माध्यमातून समाजोपयोगी संशोधन तरुणांनी केले पाहिजे. एआयमुळे तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं खूप सोपं होणार असून आपल्या क्षेत्रातील गुणवत्तेला सोबत घेऊन संबंधित क्षेत्रात भरीव असे योगदान त्यांना देता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्र, कॉस्मॅटिक इंडस्ट्री, संगीत क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र, हवामान अशा असंख्य क्षेत्रात आज आर्टिफिशियल इंटेलिजियन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतोय. उद्याचा काळ हा एआयचा काळ असणार आहे, हे मी काही वेगळे सांगण्याची गरज नाही, असे श्री. संतोष यावेळी म्हणाले.
श्री. संतोष म्हणाले, भविष्यात कोविडसारख्या एखाद्या महामारीशी अथवा साथरोगाशी आपल्याला दोन हात करावे लागू शकतात. यासाठी तरुणांनी एआयच्या माध्यमातून यावर कशी मात करता येऊ शकेल, याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपापल्या क्षेत्रात आपण ज्ञान मिळविणे आवश्यक असून ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपली एक अशी ओळख निर्माण करू शकतो की, लोकं स्वत: आपल्याकडे येतील.
व्याख्यान झाल्यानंतर श्री. संतोष यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सोनल देशमुख, प्रास्ताविक डॉ. गीता लाटकर तर आभार प्रदर्शन उपकुलसचिव डॉ.परमिंदर कौर धिंग्रा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. माधुरी कावरखे यांनी योगदान दिले.