‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे स्वयम-एनपीटीईएल ऑनलाईन कोर्सेसला नाव नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड : भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या ‘स्वयम-एनपीटीईएल’ (नॅशनल प्रोग्रॉम ऑन टेक्नोलॉजी इनहॅन्स्ड लर्निंग) ऑनलाईन अभ्यासक्रमाला ०५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘स्वयम’ चे समन्वयक डॉ. नितीन दारकुंडे यांनी कळविले आहे. विद्यापीठातून प्रचलित शिक्षण घेत असताना आपण नामांकित आयआयटी, आयआयएस्सी, येथील प्राध्यापकांकडून देखील ज्ञानार्जन करू शकतो व त्याद्वारे विविध शाखांतील नवनवीन ज्ञान अर्जित करू शकतो, हे स्वयम-एनपीटीईएल च्या विविध कोर्सेस ची वैशिष्ट्ये आहेत. कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्रे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीयशास्त्रे, सामाजिकशास्त्रे, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील सुमारे ११८३ कोर्सेसचा ‘एनपीटीईएल’ मध्ये अंतर्भाव आहे. या अभ्यासक्रमाला पदवी, पदव्युत्तर वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक, संशोधक विद्यार्थी तसेच विविध विद्याशाखांमधून शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय करत असणारे परंतु ज्ञानार्जन करण्याची जिज्ञासा तसेच आवड असणारी कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करू शकते.

Advertisement

‘स्वारातीम’ विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून श्रेयांक हस्तांतरण प्रणाली (Credit transfer Policy) तयार केलेली असून त्याचाही लाभ विद्यार्थी घेऊ शकतील. ‘स्वयम-एनपीटीईएल’ मधील सर्व अभ्यासक्रम पूर्णतः मोफत असून केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. त्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाला ०५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी केल्याशिवाय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची संधी असणार नाही. अशा प्रकारच्या ऑनलाईन कोर्सेस च्या जागरूकतेसाठी विद्यापीठात ‘स्वयम आणि मूक कोर्सेस केंद्र’ या नावाने स्वतंत्र केंद्र अस्तित्वात आहे. ‘स्वयम-एनपीटीईएल’ ऑनलाईन अभ्यासक्रमाला ऑनलाईन नाव नोंदणी आणि परीक्षा अर्ज दाखल करतांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘स्वयम-एनपीटीईएल’ लोकल चाप्टरचा पर्याय निवडावा. तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळ किंवा ‘स्वयम’ च्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page