स्वयंशिस्तच जीवनात यशस्वी करते – राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षांत समारंभ संपन्न
नागपूर : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्विस कॉलेज राजनगर, नागपूर येथे पार पडला. यावेळी कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन उपस्थितांना संबोधित करीत होते.
समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा विद्यापीठाचे मा. कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी भूषविले. यावेळी दीक्षांत मंचावर प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, व्यवस्थापन परिषद सदस्य सर्वश्री डॉ. अजय अग्रवाल, डॉ. अतुल वैद्य, डॉ. अजय चव्हाण, श्री वामन तुर्के, डॉ. रविशंकर मोर, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ. निळकंठ लंजे, डॉ. योगेश भुते, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, उच्च तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षान्त समारंभात सहभागी होणे ही एक अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद गोष्ट असल्याचे सांगत सर्वप्रथम, राज्यपाल महोदयांनी सर्व पदवीधर, पदक विजेते आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या यशामुळे अभिमानाने भारलेल्या पालक आणि कुटुंबीयांना या अभिमानाच्या क्षणी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाने नुकतेच आपली शतकपूर्तता साजरी केली आहे. याचा अर्थ १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या बॅचेसला देशभक्ती, ज्ञान आणि परिश्रमाच्या मूल्याची शिकवण विद्यापीठाने दिली आहे. या विद्यापीठाने गत शतकात ४ प्रमुख विद्यापीठांची स्थापना केली असून राष्ट्रनिर्माण कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे शतकभरात अनेक प्रख्यात माजी विद्यार्थी घडविले आहे. यामध्ये माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती म. हिदायतुल्ला, भारताचे माजी प्रधानमंत्री श्री नरसिंह राव, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश श्री. शरद बोबडे, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा यात समावेश आहे. मध्य भारतातील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणाचे धडे दिल्याचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांची यादी बघितल्यास प्रभावीपणे दिसून येते. आपला देशाचे आदर्श नेते, महान तंत्रज्ञ, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, उत्कृष्ट कलाकार, महान शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले माणूस तयार करण्याचे कार्य विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाने आपल्या शतकपूर्तीनिमित्त भारतीय विज्ञान काँग्रेस, भारतीय औषधी निर्माणशास्त्र विज्ञान काँग्रेस, राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास कार्यक्रम यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. विद्यापीठाने दाखवलेली संशोधनाची दिशा देखील प्रशंसा करण्याजोगी आहे आणि तरुण संशोधकांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, विशेषत: स्थानिक समुदायाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने, जागतिक नेते बनण्याचे आवाहन करीत राज्यपाल महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य त्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श म्हणून पुढे येत असल्याने राज्यपाल महोदयांनी समाधान व्यक्त केले. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @ २०४७’ या महत्त्वाकांक्षी मिशनच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठेवणारे हे धोरण आहे. सध्याच्या शिक्षण प्रणालीला पदवीधरांच्या नोकरीसाठी अनुकूलतेचा अभाव, विद्यार्थ्यांचा अर्थपूर्ण सहभागाचा अभाव, करिअर-केंद्रित भौतिकवादी दृष्टीकोण आणि इतर अनेक गोष्टी आदी विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे सर्व शिक्षण क्षेत्रातील हितधारकांसाठी एक मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे, एनईपी २०२० चा मुख्य लक्ष विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, धैर्य आणि कौशल्य निर्माण करणे आहे. यासाठी मूल्य आधारित शिक्षण, सार्वभौम मानवी मूल्ये, भारतीय ज्ञान प्रणाली, खेळ, आरोग्य आणि तंदुरुस्ती, योग यासारखे अभ्यासक्रम विविध कार्यक्रमांद्वारे शिकवले जातील, त्याचबरोबर संबंधित विषयांनाही समाविष्ट केले जाईल, असे राज्यपाल म्हणाले.
स्वागतपर भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाने अलीकडेच आपला शतकोत्तर महोत्सव साजरा केला आहे आणि या ऐतिहासिक समारंभाचा भाग होऊन गर्व आणि सन्मान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने अनेक प्रख्यात माजी विद्यार्थी तयार केले आहेत आणि याचा आनंद होत असून शतक भरानंतर देखील आपले विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योजनेच्या अंमलबजावणीत आपली प्रासंगिकता कायम राखत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने नेहमीच अर्थपूर्ण संशोधन आणि ज्ञान निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. संशोधकांनी अनेक प्रकाशने, संदर्भ, पेटंट्स आणि संशोधन अनुदानांच्या माध्यमातून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अलीकडेच, भारत सरकारने PURSE प्रकल्प अंतर्गत विद्यापीठाला ११.६५ कोटी रुपये संशोधन अनुदान मंजूर केले आहेत. यासह विविध माहिती त्यांनी दिली.
पुरस्कारांचे वितरण
दीक्षांत समारंभामध्ये माननीय राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते एनएमडी महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थिनी प्रगती रमेश छतवानी हिला एमबीए परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ६ सूवर्ण पदके, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी रूपाली केवलराम देशपांडे यांनी एमए (मराठी) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सूवर्ण पदके व १ पारितोषिक, नूतन पांडुरंग इंगोले यांनी एमए (पाली प्राकृत) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक, अजय सुखदेव नरांजे यांनी एमए (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक, विद्यापीठ पदव्युत्तर गृहविज्ञान विभागातील दिव्या अनिल पैतोड हिला ४ सुवर्ण पदके, विद्यापीठ जनसंवाद विभागातील तेजस अतुल पाटील याने ३ सुवर्णपदक व एक पारितोषिक, श्री बिंजानी सिटी कॉलेज नागपूर येथील केदार विश्वनाथ खोब्रागडे ४ सुवर्णपदक तर विद्यापीठाची वयाच्या ६५ व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल योगतज्ञ डॉ. विठ्ठलराव जिपकाटे पारितोषिक रामदास शरचंद्र बुचे यांना प्रदान करण्यात आले. यासह १४३ विद्यार्थ्यांना (यामध्ये ९५ मुली व ४८ मुले) १९३ सुवर्ण, ८ रजत व २६ रोख पारितोषिक असे एकूण २२७ पुरस्कार वितरित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी येथील विद्यार्थी गीथू हन्ना जॉन यांनी बी.ए. एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ६ सूवर्ण पदके व २ पारितोषिक प्राप्त करणारी विद्यार्थिनी अनुपस्थित होती.
१ लाख ३ हजार ३०३ विद्यार्थ्यांना पदवी वितरण
दीक्षांत समारंभात १,०३,३०३ विद्यार्थ्यांना पदवी / पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये स्नातक पदवीधर ८४,३१० विद्यार्थी तर स्नातकोत्तर पदवीधर १८,७७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदवीकांक्षींची ( डिग्री सर्टिफिकेट) विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – ३७,९६७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – २५,१४१, मानव विज्ञान विद्याशाखा – २४,१६०, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – ८,५२२, स्वायत्त महाविद्यालये – ६,७५८, पदविका प्रमाणपत्र -७५५
आचार्य पदवी प्रदान
या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ९०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ५२, मानवविज्ञान विद्याशाखेत ६९, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १० आदींचा समावेश आहे.
तसेच १ विद्यार्थी एम.आर्च. (बाय रिसर्च) या पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर व डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले. दीक्षांत समारंभाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.